Breaking News

मराठा आरक्षण : राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन अशोक चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती

राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन होणार असून, त्यामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विधान परिषदेत नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मंत्री चव्हाण बोलत होते. राज्य शासनाने प्रथम पुनर्विलोकन याचिका दाखल करावी आणि त्यावर निर्णय झाल्यानंतरच राज्य मागास वर्ग आयोगाचे गठन करावे, अशी शिफारस माजी न्या. दिलीप भोसले यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकार पुनर्विलोकन याचिकेवरील निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, त्यास विलंब होत असल्याने स्वतंत्रपणे मागास वर्ग आयोगाचीही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मागास वर्ग आयोग गठन करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची घोषणा होईल, असे मंत्री चव्हाण म्हणाले.
केंद्र सरकारने मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार राज्यांना दिले असले तरी मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झालेला नाही. राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध केल्यानंतरही आरक्षणाची ५० टक्के आरक्षण मर्यादा हा मोठा अडसर कायम राहणार आहे. केंद्राच्या पातळीवर ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल केली तर मराठा आरक्षणाच्या अडथळ्यांची शर्यत थोडी सोपी होईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य मिळून मराठा आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी केली.
मागील सरकारच्या काळातील कुठल्याही सवलती बंद केलेल्या नाहीत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांच्या १८ वारसांना आजवर सेवेत सामावून घेण्यात आले आहे. ३४ वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात आले आहेत. गुन्हे ३२६ पैकी ३२४ गुन्हे मागे घेण्याचा शासनाचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. राज्यातील १४ ठिकाणी वसतीगृहांची जागा व संबंधित संस्था निश्चित झाल्या असून, ७ वसतीगृहे कार्यान्वीत झाली आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय रहावा, यासाठी सहसचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. सारथीच्या पुणे येथील मुख्यालयाचे भूमिपूजन झाले आहे. कोल्हापूरचे उपकेंद्र कार्यरत झाले असून, उर्वरित ७ ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय झाला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज बंद नसून, वैयक्तिक कर्ज मर्यादा १० लाखांवरून १५ लाख तर व्याज परतावा ३ लाखांवरून ४.५० लाख रूपये करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *