Breaking News

भ्रष्टाचाराची चौकशी करायचीय तर सुरुवात नितीन गडकरींपासून करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या कटात सहभागी न झाल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करत केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला. याच टीकेचा धागा पकडत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,  मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी आधी गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी, गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झाले होते अशी आठवण करून या गोष्टींची सुरुवात गडकरींच्या घरापासून करा असे आव्हान त्यांनी मोदी सरकारला केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने भाजपाच्या नेत्यांच्या घरासमोर महाराष्ट्र द्रोही म्हणून निदर्शने करण्यात येत आहेत. काँग्रेसच्यावतीने आज नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी पटोले यांनी वरील आव्हान दिले.

संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याआधी सुरुवात नितीन गडकरी यांच्या घरापासून केली पाहिजे. कारण त्यांच्या कंपन्या नकली होत्या हे त्यावेळी सिद्ध झालं होते. केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण फक्त भाजपात नसतील ते भ्रष्टाचारी असे सुरू आहे. विरोधात असतील, मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत असतील त्यांच्यावर कारवाई करायचे षडयंत्र भाजपा केंद्रात बसून करत आहे. हे चुकीचं आहे. म्हणून भाजपाने आधी आपली घरे तपासली पाहिजे असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

नोटबंदीच्या काळात कुणाच्या बँक खात्यात जास्त व्यवहार झाले हेही तपासले पाहिजे. स्वतः भ्रष्टाचारी असताना इतरांच्या घरांवर दगड मारण्याचा प्रकार सुरू आहे. जसे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि सीबीआयला थांबवले तसेच महाराष्ट्रातही आम्ही करू. संजय राऊत एकटे नाहीत, त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत. लक्ष्य करून भाजपा कारवाई करत असेल तर त्यांना उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *