Breaking News

अजित पवार म्हणाले, “चंद्रकांत पाटील म्हणजे उचलली जीभ, लावली…” देशात... राज्यात... शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे

मराठी ई-बातम्या टीम

कोणत्याही देशात… राज्यात… शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात.आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगतानाच हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

कधीकधी दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी आहे. अशावेळी या तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल, याचा विचार केला गेला पाहिजे. एखादी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जाते. मग त्यावरुन कुणी ट्विट करतं, लगेच त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून नको त्या विषयाला महत्त्व दिले जाते. सर्वांनीच समजंस भूमिका मांडून संयम ठेवला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोरोना महामारी नियंत्रणात आणण्याचे उत्कृष्ट काम झाले. त्या कामाचे कौतुक माध्यमे, न्यायालय आणि विविध संस्थांनी देखील केलेले आहे. धारावीसारख्या भागात कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हानात्मक काम केले. वेळप्रसंगी धीर देऊन आणि कडक निर्बंध लावून नियंत्रण लावण्याचे काम केले. पण कधीकधी राजकीय भूमिकेतून कुणी टीका करतात. लोकशाही असल्यामुळे हा ज्याचा – त्याचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले.

आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत बोलत असताना सविस्तर उत्तर दिले आहे. सर्वाधिक रेल्वे गुजरातमधून सुटल्या, इतर राज्यातून किती सुटल्या याची सर्व माहिती समोर आहे. केंद्रानेच मजूरांसाठी रेल्वे पुरविल्या, मोफत धान्य दिले. त्याकाळात मजूरांनाच थांबायचे नव्हते. त्यामुळे मजूरांना मदत करण्यासाठी आपण अन्नछत्र चालविले, त्यांना एसटी बसेसची सुविधा दिली. लॉकडाऊनमध्ये मजूर उपाशीपोटी रस्त्याने चालत निघाले होते. त्यात गरोदर महिला होत्या. वृद्ध आणि लहान मुलेही होती. माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्राने त्यांना मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.

जेव्हा जेव्हा देश आणि राज्यावर संकट आल्यानंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून शरद पवार काम करत असतात. त्यामुळेच कदाचित पंतप्रधानांनी पवारसाहेबांचे कौतुक केले असावे असेही ते म्हणाले.

नवीन वर्षात अधिवेशन सुरु होते, तेव्हा राज्यपालांचे अभिभाषण असते. त्यासाठी मोठ्या सभागृहाची गरज असते. तसेच कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. विदर्भात अधिवेशन घ्यायलाच पाहिजे, या मताशी राज्य सरकार देखील सहमत आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात विदर्भात अधिवेशन घेणे शक्य झाले नसले तरी पुढच्या काळात विदर्भात अधिवेशन होईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अनेक महामंडळावरील नियुक्त्या बाकी आहेत. महिलांशी निगडीत असलेल्या महामंडळावर नियुक्ती जाहीर केलेली आहे. मात्र आता इतर महामंडळाच्या नियुक्त्या फार काळ प्रलंबित न ठेवता ते जाहीर करुन टाकाव्यात असे वैयक्तिक मत व्यक्त करताना काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील हे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांनी राज्यात जबाबदार मंत्री म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी एखादे वक्तव्य करताना त्याबाबत पुरावे दिले पाहिजेत. मी मंत्रालयात सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरापर्यंत बसून काम करणारा मंत्री आहे. हे सर्व जनता जाणते, त्यामुळे चंद्रकांत पाटीलांनी बेजबाबदार व बिनबुडाची वक्तव्ये करु नयेत असे सल्ला देतानाच महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन फिरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. कुठून कुठे जाणार याचीही माहिती द्यावी लागते. चंद्रकांत पाटील यांना ही वस्तूस्थिती माहीत आहे. तरीही ते अशी वक्तव्य करत असल्याचे सांगत याला मराठीत ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’. असे म्हणतात असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घ्यावे, हे जनतेने ठरवावे अशी खोचक टीपण्णीही त्यांनी केली.

Check Also

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *