Breaking News

माझी शाळा, सुंदर शाळा योजना समितीत या मंत्र्यांच्या ओएसडी, पीएचा समावेश जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी शासनाने जी समिती स्थापन केली आहे त्यात चक्क मुख्यमंत्र्यांच्या व शिक्षण मंत्र्यांच्या ओएसडी, पीएचा समावेश केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत सरकारला चांगलेच धारेवर धरले.

पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतचा जीआर ट्विट करत म्हणाले की, मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. या समितीत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या खाजगी सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. असा प्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाही असे सांगितले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, आतापर्यंत मंत्री महोदय, सचिव व संबंधित विषयावरील तज्ञ यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन केल्या जात असत. पण आता मंत्र्यांच्या स्वीय सहायकांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करण्याची नवीन पद्धत सुरु केली जात असल्याचे म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *