Breaking News

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार भुयार यांचा टोला, संजय राऊतांना मतपेटी… राऊतांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भुयार यांनी लगावला टोला

काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीतील मते फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची नावे घेत यांचीच मते फुटली असल्याचा आरोप केला. आता त्यानंतर पुन्हा विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला विधानसभा सदस्यांकडून मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र भुयार यांनी जुन्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

आपण आधीपासूनच महाविकास आघाडीसोबत आहोत, भविष्यातही राहणार आहोत, पण आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने पुन्हा आपल्यावर संशय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे एकतर मतदानाच्या वेळी संजय राऊत यांना मतपेटीसमोर उभे करा किंवा आपला मतदानाचा अधिकार संजय राऊत यांना द्या, असा प्रस्ताव आपण महाविकास आघाडीसमोर ठेवणार आहोत, असा टोला मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला.

देवेंद्र भुयार म्हणाले, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आपले नाव घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्षांवर अपयशाचे खापर फोडले होते. त्यावेळी आपण कुठलीही दगाबाजी केली नाही. महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे आपण छाती फोडून तर दाखवू शकणार नाही. संजय राऊत यांनी विश्वास ठेवायला हवा असा खोचक टोलाही लगावला.

महाविकास आघाडीचे नेते भ्रमात आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला होता. अपक्ष आमदारांच्या मतदार संघाच्या विकासाच्या अनुषंगाने काही अपेक्षा असतात. ते काही त्यांच्या घरातील प्रश्न सांगणार नाहीत, पण मतदार संघात विकासासाठी निधीची आवश्यकता असते, तो मिळावा, त्यांचे प्रश्नर ऐकून घेतले जावेत, ही माफक अपेक्षा असते. असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

राज्यसभा निवडणूकीत अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीसोबत दगाबाजी केली. या दगाबाजांची नावे आमच्याकडे असून त्यात देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे हे असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनीही भाजपाला मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांचा टोला, भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *