Breaking News

मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर शिंदे गट म्हणतो ते आमच्याकडे, तर खोतकर म्हणाले… मी अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही

एकेकाळी उध्दव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज सोमवारी २५ जुलै रोजी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे गटाकडून अर्जून खोतकर यांनी पाठिंबा जाहिर केल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला अर्जून खोतकर यांनी अद्याप मी तसा कोणताही निर्णय घेतला नाही. मी एका खाजगी कामासाठी आलो होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले. त्यामुळे अर्जून खोतकर हे शिंदे गटात गेले की नाही यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे खोतकरांनी एकनाथ शिंदेंचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठींबा दिला असल्याचे जाहिर केले.

दिल्लीत अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तेव्हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राहुल शेवाळे, खासदार रोहिदास लोखंडे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार धैर्यशील माने, खासदार कृपाल तुमाने आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते.

अर्जून खोतकर म्हणाले, हे खरं की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी दिल्लीला आलो आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमावरून आले आणि योगायोगाने आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा होतेच. मात्र, त्याचे वेगळे अर्थ काढू नये. मी शिंदे गटात जाण्याबाबत काहीही निर्णय बदललेला नाही. माझी एकनाथ शिंदे यांच्याशी केवळ भेट झालीय. भेट झाली याचा अर्थ मी पक्ष बदलला असा होत नाही. मी शिवसेनेतच आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

असं असलं तरी भविष्यातही शिवसेनेतच राहणार का? यावर खोतकरांनी उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

एकनाथ शिंदेंना ५० आमदारांच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील पाठिंबा जाहीर केला. तसेच संसदेतील आपला गटनेता बदलला. यानंतर खासदारांवर देखील पक्षाकडून कारवाई करण्यात आली. नुकतीच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी आज खासदार प्रतापराव जाधव यांची पुन्हा एकदा बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी पुनर्नियुक्ती केली.

दरम्यान, यासंदर्भात रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, मागील काही काळात गोष्टी झाल्या. त्यासंदर्भात समेट घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्जून खोतकर आणि माझ्यामध्ये समेट घडवून आणला. त्यामुळे आता एकत्रित काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *