Breaking News

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्म यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या… सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी दिली शपथ

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ६४ टक्के मते मिळवित विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मु यांना आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मुर्मु यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी पदाची शपथ दिली. स्वातंत्र्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून देशाला मिळालेल्या आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी उपस्थित होते.

संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मु यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्या म्हणाले की, देशातील महिला, मुली जास्तीत जास्त सक्षम झाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं पाहिजे. तरुण फक्त आपलं भविष्य निर्माण करत असून देशाच्या भविष्याचा पायाही रचत आहेत. माझा तुम्हाला नेहमी पाठिंबा असेल. भारत आज प्रत्येक क्षेत्रात विकास करत आहेत. कोरोना काळात भारताने जे सामर्थ्य दाखवलं, त्यामुळे संपूर्ण जगाला आपल्यासोबत पुढे नेण्याचं काम केलं. आपण भारतीयांनी आपल्या प्रयत्नांनी फक्त जागतिक संकटाचा सामना केला, तर जगासमोर नवे मापदंडही ठेवले. काही दिवसांपूर्वी आपण २०० कोटी डोस देण्याचा विक्रम केला आहे. या संपूर्ण लढाईत भारताने दाखवलेला संयम, साहस आपली शक्ती आणि संवदेनशीलतेचं प्रतीक आहे. भारताने जगालाही मदत केली. आज जग भारताकडे नव्या विश्वासाने पाहत असल्याचे गौरवौद्गार काढले.

देशाला राष्ट्रपतीपदाची मोठी परंपरा असून मी पूर्ण निष्ठेने कर्तव्याचं पालन करेन. सर्व देशवासीय माझ्या ऊर्जेचे स्तोत्र असतील असे सांगत त्या म्हणाल्या की, देशातील गरिबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. देशातील करोडो महिला आणि मुलींच्या स्वप्न आणि सामर्थ्याची झलक आहे. प्रगतशील भारताचं नेतृत्व करताना मला अभिमान वाटत आहे. सर्व देशाविसायांना आणि खासकरुन तरुण, महिलांना आश्वस्त करु इच्छिते की, त्यांच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिले.

वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात असेही त्या म्हणाल्या.

ओडिशामधील छोट्याश्या आदिवासी गावातून माझा प्रवास सुरु झाला होता. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणंही स्वप्नाप्रमाणे होतं. पण अनेक अडथळ्यांनंतरही मी संकल्प सोडला नाही. कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती होती, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. पुढील २५ वर्षात आपल्याला ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार आहे असं आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची ५० वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. २५ वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, उलगुलान बिरसा मुंडा यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांनी दाखविलेल्या विचारधारेवर पुढील मार्गक्रमण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *