Breaking News

आंबेडकरांच्या मोदींच्या समर्थनावर शरद पवार म्हणाले, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही वंचितशी युतीचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही

मागील दोन दिवसांपासून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपाशी संबध असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे समर्थन केले. तसेच सरकारी यंत्रणांच्या गैरवापरावरही मोदींच्या कृत्याचे समर्थन केले. यावरून प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वादही झाला. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, यावर चर्चाच होऊ शकत नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय यावर कोण काही बोलतेय याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे असे सांगत वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.
कोल्हापूरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार हे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वरील वक्तव्य केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आगामी निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही असे सांगत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान नसल्याचे एकप्रकारे सूचित केले.

महाविकास आघाडीमधील तीन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये एकत्र असण्याबाबत स्पष्टता आहे. पुढचे निर्णय कसे घ्यायचे याबाबत आमचा एकमेकांशी संवाद सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनवरोध व्हाव्यात यासाठी चंद्रकांत पाटील पत्र लिहिणार आहेत. ते कोणाला पत्र लिहिणार आहेत, या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. कोल्हापूर, पंढरपूर व नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांना आत्ताच कसे सुचलं कळत नाही असा टोलाही शरद पवार यांनी भाजपाला लगावला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, नाशिकमध्ये कुटुंबियांनीच मुलीची केलेली हत्या ही घडलेली घटना गंभीर असून याबाबत राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्थेबाबत गांभीर्याने बघण्याची गरज आहे. अलीकडे रोज अशा बातम्या वाचायला मिळतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे. याची नोंद मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे अशी सूचना केली.

लव्ह जिहाद आणि हिंदू जनजागर आक्रोष मोर्चे निघत आहेत. या प्रकरणांमागे विशिष्ट विचारधारा काम करत आहे. या विचारधारा समाजात जातीय तेढ कशी वाढेल? याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

बीबीसीने पंतप्रधानांवर डॉक्युमेंट्री बनवली, त्यावर बंदी घातली आहे. एखाद्या फिल्मवर बंदी घालणे लोकशाहीच्या विरोधी आहे. एखाद्याला फिल्म बघायची असेल तर तो त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. अ, ब, क लोकांना ती फिल्म आवडत नसल्यामुळे तिचे प्रदर्शनच रोखायचे, हे काही ठिक नाही. हे सगळे लोकाशाहीच्या विरोधात चालले आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केली.
लोकसभा-विधानसभा एकत्र होतील का? या प्रश्नावर पवार म्हणाले की, काही सांगता येत नाही काय होईल ते. काही लोक म्हणत आहेत, एकत्र होतील म्हणून. पण याची पक्की माहिती माझ्याकडे नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यांमध्ये नगरसेवकांना एक कोटीचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केल्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना मूळ पक्षातून फोडून अन्य ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदे गटाकडून यासंबंधीची पावले अधिक दिसतात. निवडणूक जवळ येताच, या गोष्टी होत असतात. पण त्याची फार चिंता करायची नसते.
महाराष्ट्राचे राज्यपाल बदलणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंह राज्यपाल म्हणून येणार अशी चर्चा आम्ही देखील ऐकून आहोत. आताचे राज्यपाल यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली, याचाच एकप्रकारचा आनंदच आम्हा सर्वांना आहे, अशा शब्दात पवार यांनी राज्यपालाच्या जाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लोकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सामान्य माणसाचे सहकार्य आणि पाठिंबा यात्रेला मिळालेला आहे. लोक याकडे गांभीर्याने पाहत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची टीका, उबाठा रंग बदलणारा सरडा

युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *