पुण्यात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर उलट-सुलट तर्क-वितर्क लढविले जात असताना यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत खोचक सवाल केला.
अहो भारतात कोणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्याला जाऊ द्या. पण त्यांच्या जाण्याचा इतका बोभाटा करायचे काम नाही. आम्हीही शिर्डीला गेलो. पण बोभाटा केला नाही. पण काहींना आम्ही काही तरी वेगळं करून दाखवतोय असे दाखवायचे आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला.
याच मुद्यावर स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण मराठी माणसांना एकत्र ठेवण्याचे काम केले. ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या रस्त्याने शिवसेना पुढे चालली आहे. तो मराठी माणूस तुमच्या सोबत येत नाही म्हणून कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.
त्याचबरोबर काल आम्हीही हनुमान चालिसा बोललो पण त्याचा प्रोपोगंडा करण्याची गरज वाटली नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
निवडणूका आल्या की आम्ही आमची भूमिका मांडू, कोणत्या शहरासाठी काय केले, काय करणार आहोत हे संगळ सांगणार आहोत. निवडणूकीत कोणाचा जय होतो तर कोणाचा पराभव होतो. त्यामुळे तशा वक्तव्यांना फारसं देण्याचे कारण नाही. कोणीही सगळं सोडून हिमालयात जाणार नाही हे आपल्यालाही कळतं असे सांगत चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावरून अप्रत्यक्ष पाठराखण केली.
विविध धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या सणांमध्ये, उत्साहात, जयंतीत सहभागी झालं पाहिजे. सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे. जाती-धर्मात तेढ निर्माण होणार नाही, सगळे गुण्या गोविंदाने नांदतील असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. हेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वांना सांगितलं आहे. म्हणूनच आपला भारत देश एकसंघ पहायला मिळतो असेही सांगायलाही ते विसरले नाही.
