Breaking News

देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, उध्दव ठाकरेंना दिवाळी शुभेच्छा दिल्या नाहीत पण जरूर देऊ उध्दव ठाकरे यांच्याबरोबर युती करणार का? राजकारणात काहीही अशक्य नाही

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटूता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटूता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत पण त्या जरूर देऊ असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमाशी औपचारीक गप्पा मारल्या. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, खाते कुठलेही असो आपण मन लावून काम केले पाहिजे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. पण खरे पाहिले तर पायाभूत सुविधांच्या संदर्भात काम करायला आवडते, कारण तिथे रिझल्ट लवकर देता येतो. गृहखाते सांभाळताना फार सावध राहावे लागते. इतर खात्यांच्या तुलनेत गृह खाते हे आव्हानात्मक आहे.

राजकारणात अशक्य काहीच नसते. हा सिद्धांत पाहता उद्धव ठाकरे यांच्या सोबत कधी पुन्हा युती होईल का असे विचारले असता, राजकारणात अशक्य काहीच नसते हे खरे असले तरी जर-तरच्या प्रश्नांना देखील राजकारणात उत्तरे नसतात. ती दिली तर संशयाचे वातावरण उगाचच निर्माण होते असे सांगत उध्दव ठाकरे यांच्याबरोबरील युतीचा मार्ग अद्याप खुलाच असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’वर दिवाळी निमित्त पत्रकारांशी संवाद साधायचे. आता अडीच वर्षानंतर हा योग जुळून आला. अडीच वर्षापूर्वी वादळ आले होते, पण ते वादळ ठरलेलेच होते, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा युती तोडण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता, असे सूचित केले.

नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबर २०२२ रोजीपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून राज्याला राज्यमंत्री लवकरच देऊ असे सांगत राज्यमंत्र्यांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *