Breaking News

भाजपने डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला?

डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव आहे. सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली नाही असा घणाघाती आरोप करून डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला? याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

सामाजिक दुष्परिणाम, तरूणांचे भवितव्य आणि स्त्रियांच्या आयुष्याची होणारी धुळघाण थांबवण्याकरिता काँग्रेस प्रणित आघाडी सरकारच्या काळामध्ये डान्स बारवर बंदी घालण्यात आली होती. हजारो कुटुंबे उद्धवस्त करणारे डान्स बार बंद करण्यासाठी काँग्रेस सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व एकंदरीतच भाजपची भूमिका सत्तेतवर आल्यानंतर पूर्णपणे बदलेली आहे. २०१४ नंतर भाजप सरकारने डान्सबार बाबत बोटचेपी भूमिका घेतली. २०१६ साली तर जाहीरपणे डान्सबार चालकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली होती. सरकारची डान्स बार चालकांशी जवळीक आहे, हे तेव्हाच स्पष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारने प्रभावीपणे बाजू न मांडल्याने २०१६ साली सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार सुरु करायला परवानगी दिली. यानंतर लाजेखातर सरकारने कायदा करून डान्सबारवर अत्यंत कडक अटी शर्ती घातल्याचा देखावा केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात जवळपास सर्वच अटी रद्द केल्या आहेत. आता शालेय शिक्षण संस्थांच्या एक किलोमीटर परिसराच्या आतही डान्स बार सुरु करता येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. तसेच नृत्यकक्ष आणि मद्यकक्ष वेगळे असावेत ही अट देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ख-या अर्थाने २०१६ चा या सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केल्याने सरकारची अब्रू गेल्याची टीका त्यांनी केली.

 आपणच केलेला कायदा न्यायालयात टिकू नये यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे हीच या सरकारची कार्यपद्धती राहिली आहे. डान्स बार सुरु करून लोकांचे उद्धवस्त होणा-या संसारापेक्षा निवडणुकीसाठी मिळणारा निधी अधिक महत्त्वाचा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

डान्‍सबार बंदीबाबत सरकार अपयशी !: विखे पाटील

डान्सबार सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नियम व अटी शिथील करून दिलेली परवानगी हे  राज्य सरकारचे मोठे अपयश असून, याबाबत सरकारकडून करण्यात आलेले दावेही फोल ठरल्याने सरकाची भूमिका प्रामाणिक नव्हती हे स्पष्ट असल्याची संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

डान्सबार संदर्भात विधानसभेत आणि सभागृहाबाहेर झालेल्‍या चर्चेचा संदर्भ देवून, विखे पाटील म्हणाले की,मुख्यमंत्री याबाबत अनेक दावे करीत होते. पण डान्‍सबार बाबत सरकारने आजवर घेतलेली मवाळ भुमिका पाहता सरकारमधील काही लोकांची डान्‍सबार मालकांशी हात मिळवणी असल्‍याचे दिसुन येते. स्व. आर. आर. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून, डान्‍सबारबंदीचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाबाबत सरकार गंभिर नसल्‍यामुळेच ही वेळ उद्भवली असुन, याची जबाबदारी आता मुख्‍यमंत्र्यांनीच घ्‍यावी.

Check Also

प्रज्वल रेवन्नाचे वडील एचडी रेवन्ना यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

माजी मंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी रेवन्ना यांच्यासमोरील अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. हसनचे खासदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *