Breaking News

अन्नधान्यावरील जीएसटीवरून संसदेत आंदोलन; काँग्रेसचे खासदार निलंबित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली कारवाई

देशातील वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून चर्चेची आणि अन्नधान्यावर लावण्यात आलेली जीएसटी रद्द करण्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात फलक घेऊन निदर्शने केली. फलक फडकाविल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा इशारा दिला होता. तरीही काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात आंदोलन सुरुच ठेवल्याने या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनाच्या कालावधी पर्यंत निलंबित केले.

आंदोलन करायचं असेल तर त्यांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलन करावं, अशी सूचना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या खासदारांना केली होती. पण काँग्रेसच्या खासदारांनी महागाईविरोधातील आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे काँग्रेसच्या ४ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी त्यांना आता संपूर्ण अधिवेशनासाठी मुकावं लागणार आहे.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांचा समावेश असून निलंबनाची कारवाई केल्यानंतर चारही खासदारांनी संसद भवनासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन जोरदार घोषणाबाजी केली.

दुपारी ३ नंतर महागाईबाबत चर्चेसाठी तयार आहोत, परंतु सभागृहात फलक घेऊन केलेलं आंदोलन सहन करणार नाही. तुम्हाला जर फलक दाखवून आंदोलन करायचं असेल तर ते सभागृहाबाहेर करा. मी चर्चेसाठी तयार आहे, माझ्या दयाळूपणाला कमकुवतपणा समजू नका, असा इशारा लोकसभा अध्यक्षांनी दिला.

त्यानंतर त्यांनी उद्यापर्यंत कामकाज तहकूब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावं आणि महागाई व खाद्यपदार्थांवर अलीकडेच वाढवलेल्या जीएसटीबाबत आपलं मत व्यक्त करावं अशी मागणी आंदोलनकर्त्या काँग्रेस खासदारांनी केली. तसेच १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महागाईबाबत चर्चा करावी अशी मागणीही विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *