Breaking News

एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस म्हणाली, तर आमचे… आघाडीचा कोणताही प्रस्ताव नाही: अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडी सोबत युती करायला तयार आहे. असे वक्तव्य एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पण त्यांच्या पक्षाच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीतून मात्र तसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा केल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.

जलील यांच्या वक्तव्यावर बोलताना लोंढे म्हणाले की, युती किंवा आघाडी ही समान विचारधारा आणि समान उद्देश असणा-या पक्षासोबत केली जाते. विरूद्ध किंवा वेगळ्या विचारधारा असणा-या पक्षांसोबत आघाडी होऊ शकत नाही. महाराष्ट्रात भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. जनतेच्या हितासाठी संविधानाच्या विचारानुसार किमान समान कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमानुसार महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आली आणि कार्य करत आहे. एकीकडे भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी अस्तित्वात आली असताना देशभरातील विविध राजकीय पक्षांनी आपण भाजपा विरोधी असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल केली व धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करून भाजपला फायदा होईल अशा भूमिका सातत्याने घेतल्या. एमआयएम पक्षानेही लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला पूरक भूमिका घेतल्या त्यामुळे फक्त राजकीय पक्षच नाही तर देशातील जनता सुद्धा त्यांना भाजपची बी टीम म्हणते.  

काँग्रेस पक्ष संविधानाने दिलेल्या विचारांवर चालतो. देशातील जाती, धर्म या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन चालणारा अशी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. उलटपक्षी भारतीय जनता पक्ष हा फक्त हिंदुत्वाचे राजकारण करून जाती धर्मात तेढ निर्माण करून देशात राजकारण करत, राजकीय फायद्यांसाठी विभाजन करत आहे. एमआयएमनेही वारंवार भाजपाला पूरक भूमिका घेऊन भाजपाच्या फायद्याचेच राजकारण केले आहे. काँग्रेस पक्ष जात, धर्म, प्रांत, भाषा यावर आधारीत विभाजनवादी राजकारण करत नाही. संविधान आणि लोकशाहीला संपवून हुकुमशाही पद्धतीने कार्य करणा-या भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांच्या समविचारी पक्षांसोबत मिळून काम करत आहे. देशातील सर्वच धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला रोखले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एमआयएमने काँग्रेस पक्षाला आघाडीबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव दिलेला नाही. यासंदर्भात कोणतीही चर्चा केलेली नाही. किंवा महाविकास आघाडीतही या संदर्भात चर्चा नाही. एमआयएमकडून तसा अधिकृत प्रस्ताव आला तर त्यावर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचे मत घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *