Breaking News

कुटुंबियांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केला मंत्रालयातून कामकाजाला प्रारंभ कुटुंबियांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून आलेल्या उध्दव ठाकरे यांचे मंत्रालयात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यत ठाकरेंच्या स्वागतासाठी हार-तुरे आदी गोष्टींची सजावट करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अपवादात्मक परिस्थितीतच मंत्रालयात आले. परंतु त्यांच्याच पक्षातून फुटून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनीही आपल्या कुटुंबियांच्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री पदाचे अधिग्रहण मंत्रालयातील आपल्या दालनात करत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.

यावेळी एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा पदभार स्विकारणार असल्याने मंत्रालयातील त्यांचे दालन फुलांनी सजविण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत त्यांच्या गटाचे काही बंडखोर आमदार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश केल्यानंतर त्या आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *