Breaking News

कबुलीनंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल तर… भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला टोला

मराठी ई-बातम्या टीम

भाजपा आणि शिवसेनेत अंतर वाढविण्याच्या कामाची शरद पवारांनी जाहीर कबुली दिली आहे. त्यानंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल तर ते त्यांना लखलाभ होवो, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावत आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ सुरु असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास ध्यानात घेता, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यात गेले दोन दिवस जे घडत आहे ते आघाडीतील घटकपक्षांमध्ये बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी चालू झालेल्या चढाओढीचा परिणाम आहे. तथापी, गेल्या २६ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा, त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा आणि भाजपा आमदारांना विकासासाठी निधी नाकारण्याचा इतिहास आहे. तो पाहता यांच्यापैकी कोणासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. अर्थात याविषयीचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारकडून भाजपा कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणे व त्यांना अडकविण्याचा प्रयत्न चालू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आघाडी सरकारचे तोंड फुटले. आता दादागिरी करून नितेश राणेंच्या बाबतीत दुसरा प्रयत्न चालू आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा विधिमंडळात ठराव झाला असला तरी त्यामागे सरकारची ओबीसी आरक्षणापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाची काळजी आहे. लगेच निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारासाठी उपलब्ध असणार नाहीत. एकमेव नेता उपलब्ध होणार नसेल तर निवडणुका पुढे ढकला याला अधिक महत्त्व देऊन ठराव झाला. तथापि, राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करण्याची भूमिका पाहता या ठरावाचा किती परिणाम होईल याची शंका असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विधिमंडळाच्या पाच दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशात सामान्य लोकांच्या हिताचे एकही काम सरकारने केले नाही. केवळ ३२००० कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणे आणि घाईघाईत १९ विधेयके मंजूर करून घेणे हे काम या सरकारने केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक नकोच होती, त्यामुळे त्यांनी प्रयत्न केल्याचा फार्स केल्याचा आरोप त्यांनी केला.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *