Breaking News

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात, मला फिरायचं असतं, वाय प्लस सुरक्षा द्या

तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून सुरक्षा व्यवस्था न पुराव्याचे प्रकरण ताजे असतानाच आता व शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षव्यवस्थेत वाढ करण्यात आली. तर मागील काही दिवसात उध्दव ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची सुरक्षा कमी करण्याचे प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे पदूम आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपणास ऱाज्यभरात फिरावयाचे असल्याने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाकरे सरकारमध्ये वजनदार मंत्री म्हणून कार्यरत असलेले तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत प्राबल्य वाढत चालले होते. ठाकरे सरकारमध्ये त्यांना गडचिरोली या नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. यावेळी त्यांच्या जीवाला संभवणारा धोका लक्षात घेता त्यांच्या सुरक्षव्यवस्थेत अधिक वाढ करण्याची मागणी शिंदे यांच्याकडून तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे करण्यात आली होती . मात्र ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच त्यांना अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास गृहमंत्री कार्यालयाने नकार दिल्याचा गौप्य स्फोट दस्तरखुद्द देसाई यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर शिंदे ठाकरे यांच्यातील संबंध ताणले गेले होते. शिंदे यांचे पक्षातील वजन दिवसेंदिवस वाढत चालल्याने तसेच त्यांच्या बंडखोरीची कुणकुण लागल्यामुळेच ठाकरे यांनी त्यांची सुरक्षाव्यवस्था न वाढविल्याची माहिती त्यावेळी पुढे आली.

दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट या दोन शिवसेनेत जागोजागी उफाळत असलेला संघर्ष लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवितास धोका असल्याची शक्यता लक्षात घेता शिंदे गटाच्या ३९ आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्था पुरविली.

त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये उध्दव ठाकरे गटाचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील प्रतिस्पर्धी राजन विचारे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती नुकतीच पुढे आली. त्याचबरोबर कोकणातील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचीही सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने कमी केल्याची माहिती पुढे आली. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या मंत्र्याने फक्त फिरण्याच्या कारणावरून सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी केली.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री म्हणून समावेश झालेला आहे त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा संबंध थेट शेतकरी तसेच शेतीपूरक व्यवसायाशी येतो हा शेतकरी सध्या अडचणीत आहे जनावरांना लंपी सारख्या रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झालेली आहे . शिवाय अतिवृष्टीमुळे जनावरे,दुधाव्यवसाय तसेच तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता राज्याचे दौरे करून थेट शेतकऱ्यांच्या गाठीभेटी करण्यासाठी विखे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर निघण्याच्या तयारीत आहेत. परंतु या दौऱ्यादरम्यान विरोधकांच्या रोषाला बळी पडू नये तसेच राज्याचे दौरे विनासायास करता यावेत यासाठी राधाकृष्ण विखे पाटील याना एस्कॉर्ट सुरक्षेसह वाय प्लस दर्जाची सुरक्षा हवी असल्याचे त्यांच्याच कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *