Breaking News

‘हा’ माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन, उध्दव ठाकरेंची विदर्भात सभा

शिवसेनेतील फुटीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात अद्याप निकाल प्रलंबित असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिवसेना कोणाची याबाबत अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच अंधेरी पोट निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेला अनेक पक्षांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका आणि त्यापाठोपाठ विधानसभा, लोकसभेच्या निवडणूका कधीही लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या जशी वाढताना दिसत आहे. तशी ठाकरे गटातही आजी-माजी आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडूनही प्रवेश करण्यात येत आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गट वेगवेगळ्या योजना आखत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून शिंदे-भाजपा सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी ठाकरे उद्धव ठाकरेंनी नवी रणनीती आखली आहे.

यवतमाळमधील दिग्रसचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख येत्या २० ऑक्टोबर रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासून झाली होती. मात्र त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपा पक्षात प्रवेश केला होता. येत्या २० ऑक्टोबर रोजी ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार आहेत. शिंदे गटातील नेते संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आता संजय देशमुख यांना बळ दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यवतमाळमध्ये अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. मात्र त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे संजय देशमुख यांना बळ देणार आहेत. संजय देशमुख हे आधीपासूनच संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर संजय देशमुख यांच्यासह उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्या यवतमाळमध्ये सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या राजकीय खेळीमुळे संजय राठोड यांच्याविरोधात आगामी काळात मोठे आव्हान उभे राहू शकते.

दरम्यान, विदर्भातील या पहिल्याच सभेमुळे शिंदे गटात गेलेल्या खासदार आणि आमदारांसमोरही एकप्रकारे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *