Breaking News

उध्दव ठाकरे गटाच्या आरोपामुळे भाजपा उमेदवार मुरजी पटेल अडचणीत भाजपा काय उत्तर देणार याकडे लक्ष

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाच्या पाठिंब्याने शिवसेनेचेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथून टाकले. त्यानंतर अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे विरूध्द शिंदे गट-भाजपा दरम्यान पहिली लिटमस टेस्ट होत आहे. या निवडणूकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला तर भाजपा-शिंदे गटाच्यावतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारी प्रतिज्ञा पत्रात अनेक गोष्टी लपविण्यात आल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे लटके-पटेल ही लढत चुरशीची होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी तथा मुंबई पालिकेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. पटेल यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आरोप नाईक यांनी केला. तसेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणीही नाईक यांनी करत या मागणीला घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा दिला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप नाईक बोलत होते.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे मुरजी पटेल यांच्यावर सहा वर्षांसाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्यावर बंदी आहे. महाराष्ट्र शासनाने तसे महापालिकेला सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्याविरोधात निकाल दिलेला आहे. भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या माणसाला निवडणूक लढवण्यासाठी कशी परवानगी दिली जाऊ शकते? निवडणूक आयोगाने मुरजी पटेल यांच्या मतदानाचा अधिकार का काढून घेतला नाही? घेतला असेल तर तो आम्हाला सांगावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच मुरजी पटेल यांनी पोटनिवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या शपथपत्रात काही माहिती लपवलेली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. ही माहिती त्यांनी लपवलेली आहे, असा दावाही त्यांनी केला.

शिंदे गटाने या निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, अशी आमची इच्छा होती. तसेच एखाद्या पक्षाला समर्थन द्यायचे असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीला त्यांनी समर्थन देऊ नये, असे आमचे मत होते. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्याविरोधात त्यांनी अशा माणसाला उभे केले आहे. आम्ही मुरजी पटेल यांच्या उमेदवारीविरोधात न्यायालयात जाणार आहोत. तसेच त्यांची उमेदवारी बाद करण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी मला पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यास सांगितले. मी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मला मुरजी पटेल यांच्याविरोधात आक्षेप घेता आला आहे. अन्यथा मला तो अधिकार नसता, असे ठाकरे गटाचे संदीप नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान या सर्व आरोपावर अद्याप तरी भाजपाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपा काय उत्तर देणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *