Breaking News

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, अजित पवार खोटे बोलतायत… आदेश आल्यानंतर मी, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात तिघे भेटलो

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं. नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनाम्याची माहिती दिली, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले.

प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही.

मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता, तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

यावर दिल्लीत एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना नाना पटोले यांनी अजित पवारांना खोटारडे म्हटलं आहे. अजित पवार खोट बोलत आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आम्ही एकत्र अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांना सांगितलं होतं, मला आदेश आलाय, राजीनामा द्यावा लागेल, असे सांगितले. तसेच अजित पवार यांनीच माझ्यावर आरोप करताना केलेल्या विधानाचा खुलासाही त्यांनी केल्याचे पटोले म्हणाले.

तसेच नाना पटोले पुढे म्हणाले, मी अध्यक्षपदावरून नव्हतो, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता आली असती. ती त्यांनी केली नाही. एक वर्ष आम्ही अध्यक्षांची नेमणूक केली नाही, हे अजित पवारांनी मान्य केलं. पण, उपाध्यक्षांनी अध्यक्षांचे अधिकार वापरले नाहीत, असेही पटोलेंनी सांगितलं.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *