Breaking News

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे म्हणाले, तर त्याचा ऱ्हासाकडे… ट्विट करत नाव न घेता केली टीका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी काल रात्री आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सगळ्या नाट्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता खोचक टीका केली.

विशेष म्हणजे मागील महिन्यात औरंगाबाद येथे आयोजित जाहिर सभेत उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र यांना माहित नाही की ते कोणत्या व्यक्तीसोबत आहेत असा सूचक वक्तव्य केले होते. मात्र आता शिवसेनेच्या बंडाळी मागे भाजपाच असल्याचे सिध्द झाल्यानंतरही राज ठाकरे यांनी एका चकार शब्दाने त्याचा उल्लेख केला नाही.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज एक ट्विट करत उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असून त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वत:च कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो अशी खोचक टीका उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याच्या विरोधात राळ उठवित हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे झालेल्या जाहिर सभेत राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य करत राज्यातील सत्तेवर भाजपाचा हक्क असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अनैसर्गिक युती करत सत्ता स्थापन करण्यावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते.

तसेच उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्याला ईडीची नोटीस आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरही राज ठाकरे यांनी टीका करत आधी घरच्यांना सांग महापालिकेत जावू नको म्हणून अशी सूचनाही केली होती. तसेच भाजपाची भलामणही केली.

मात्र आता शिवसेनेतील बंडाळीमागे भाजपाचे नाव उघड होवूनही राज ठाकरे हे चकार शब्द काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *