Breaking News

मिस्टर विकास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत कथा

जग्गूचा  कुत्रा फेमस. जग्गूला २०१४ च्या प्रचार मोर्चात एका रस्त्याच्या कडेला पक्षाचा झेंडा चघळत पडलेला सापडला. जग्गूने त्याला उचलून घरात आणलं आणि मोदी निवडून आल्यावर चांगल्या पायगुणाचा कुत्रा म्हणून चक्क जग्गूने त्याचं जे बारसं घातलं, ते अख्या गावभर फेमस झालं. लोकांनी कुत्र्याचं नावं विकास ठेवलं. जग्गू ने गावाला विश्वास ठेवायला भाग पाडलं कि माझ्या कुत्र्याचा पायगुण चांगला म्हणून मोदी पंतप्रधान झाला. लोकं विश्वास ठेवायला लागले. त्यानंतर अगदी सरपंचकीपासून आमदारापर्यंत सगळ्यांची रांग विकास पुढे लागू लागली. सध्या गाव सोडून बाहेर इतका विकासचा पायगुण प्रचलित नव्हता पण आमदारापर्यंत बोलबाला झाला होता. एक दोन आमदार दारावर येऊन ही गेले. शेजारच्या पाच सहा गावचे सरपंच येऊन गेले. निवडून आलेले विकासला काही मोबदला द्यायचं कबूल कारायचे पण शक्यतो विकासाच्या ताटापर्यंत कोणाचा मोबदला पोहोचायचाच नाही. जग्गू ही वैतागला आता कोणी विकासला भेटायला यायचं कळलं कि विकासला एका खोलीत बांधून ठेवायचा. येणारे आल्या पावली परंत जाऊ लागले विकास मोठा होऊ लागला त्याची क्रेझ कमी होऊ लागली. ज्या ज्या लोकांना असं वाटायचं कि आपला सरपंच किंवा आपला आमदार विकासमुळे निवडून आलाय त्यांना त्यांना लोक शोधून शोधून शिव्या देऊ लागले. विकासकडे आता जग्गू ही लक्ष्य देईनासा झाला.

विकास जसजसा मोठा होऊ लागला तसतसा लोकांमध्ये त्याच्याबद्दल रोष वाढू लागला. विकास ही घाबरून आता रात्रीचा बाहेर पडू लागला. जग्गू दारू अड्डयावर पडून असायचा त्याला हल्ली कोणीच किंमत देत नव्हतं. जग्गूला विकास बद्दल जराही आत्मीयता राहिली नाही तो आता विकासला दारावरूनच बांबू उगारून पळवून लावायचा. विकास आतमध्ये येऊ नये याची जग्गूने काळजी घेतली. विकास आता गेटवरच रात्रभर झोपू लागला. लोकं ही विकासला पळवून लावू लागले. विकासच्या आता बरगड्या दिसू लागल्या. त्याचं सुकत चाललेलं शरीर स्वतःला जड वाटू लागलं. तो हलत चालू लागला. उकिरड्यावर बसू लागला. तो तासन तास एकाच जागेवर मान टाकून बसू लागला. जग्गू त्याच्याकडे बघून नं बघितल्यासारखा करून पुढे जाऊ लागला. कावळे बसून जखम पडलेली ओढू लागले तरी विकासमध्ये पापणी हलवण्याची ताकद उरली नाही.

तो  जागेवर मरणाची वाट पाहत असताना, रस्त्याने चालत जाणारा प्रचार संच पाहिला त्यात जग्गू हलत हलत जाताना विकासला दिसला. जग्गूच्या गळ्यातला पक्षाचा मफलर कचऱ्यात पडला, तो विकासच्या शेजारी. विकासला भुंकून जग्गूला आपल्या  जवळ बोलवायची इच्छा असूनही शक्तिहीन नजरेने पाहत राहिला. जग्गू नकळत थुंकी टाकून पुढे लोकांमधून चालत राहिला. थुंकी विकासवर पडली. लोकांची झुंड पुढे चालत राहिली इतक्यात एक कावळा येऊन विकास च्या डोक्यावर बसला आणि जोराची  चोच उघड्या डोळ्यावर मारून डोळ्याला चोचीत धरून झुंडीच्या दिशेने उडत गेला. काही दिवसानी ग्रामपंचायतीची गाडी विकासचा सापळा उचलून घेऊन गेली. जग्गू आता प्रचार सभांना जातो.

त्याला विकास आता कुठच्या कोपऱ्यात कचऱ्यावर पडलेला नाल्यात चिखलात पडलेला दिसत नाही. विकास प्रोग्रेसिव्ह होऊन आता तो स्टेज वरून भाषण देत असतो. जग्गूला ना आता विकासशी देणं घेणं, ना कोणाशी, जग्गू आता जिवंत राहण्यासाठी जगतो.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *