Breaking News

मूर्ती दहन… सर्जनशील लेखक आणि कलावंत सुदेश जाधव यांची खास कथा

काश्या म्हाताऱ्याच्या अंगणात तुडुंब गर्दी भरली होती. अंगणात पूर्ण भयाण शांतता. म्हाताऱ्याचा जीव कशात तरी अडकला होता. म्हाताऱ्याला कांदा भजी आवडायचे म्हणून गावच्या सरपंचाने एका प्लेटीतून कांदाभजी आणलेले. उशाला तसेच पडून होते. भजीला वास सुटला पण म्हाताऱ्याचा जीव काय सुटेना. म्हाताऱ्याला काहीतरी सांगायचं होतं पण म्हातारा काय तोंड उघडेना. म्हाताऱ्याला फणसाच्या  गऱ्याचा वास आवडतो असं सुनेने सांगितलं म्हणून सीजन नसल्यामुळे तालुक्यावरून फणस आणून म्हाताऱ्याच्या बाजूला एक अर्धा काप कापून ठेवला.  तरी म्हातारा तोंड उघडेना. इतक्यात पार्वती म्हातारी पानाची पिशवी कनवटीला बांधून खाल्लेला तंबाखू दरवाज्याच्या कोनाड्यात फेकला आणि बोटाला चिकटलेला तंबाखु दरवाजाला पुसला. म्हातारीचा आवाज ऐकताचं म्हाताऱ्याने कूस हलवली. पार्वती येऊन काश्याच्या बाजूला बसली. काशाने घसा खाकरल्या बरोबर अंगणात बसलेले  सगळे उठले आणि कोणी खिडकी जवळ कोणी दारावर येऊन उभं राहिलं. अंगणात बसलेला परशा पचकला.

“म्हातारा पण चावट लवाड्याचा म्हातारी आल्याबरोबर त्याचा घसा उचाकला  लगेच. “खिडकीत आणि दरवाजातून वाकुनं बघणारे एकदाच परशाकडं बघितलं .पण सत्य त्यांना ही कळलं होतं. बाकी सगळं विसरून त्यांनी काश्या काय बोलणार याकडे सगळ्यांची नजर लागली. काश्याने अंगठा  दाखवला, संतोषला वाटलं दारू मागतोय संतोषने एक मोटली काढून काश्याच्या हातात ठेवली काश्या वैतागला

“आर रांडच्या पाणी पाणी ” एवढं बोलून काशाला धाप लागली त्याला चटकन पाणी पाजलं आणि संतोषला बाहेर बसायला सांगितलं. काशाने आवंढा गिळला पार्वतीकडं पाहिलं आणि काशा बोलला. “आपल्या नदीचा पूल नं होण्याच कारण मीच हाय “. सगळे अवाक होऊन पाहू लागले काशा तसाच भूतकाळात पोहोचला.आणि एक सिनेमा उभा करावा असा लोकांनाही आप आपल्या परीने काश्या भूतकाळात घेऊन गेला आणि लोकांना एकेक घटना डोळ्यासमोरं उभी  राहिली.

पार्वती गुपचुप नदीच्या टेम्बीशी निघाली काश्या तिथे आधीच जाऊन बसला होता. पार्वतीला पाहताच काश्या घाबऱ्या आवाजात बोलला “हे बघ पार्वते तुझही आत्ताच लग्न झालंय आणि माझंही. असं एकांतात कोणी बघितलं त करमाने मरेन मी. त्यात तुझा नवरा राजकारणी मला कुठच्या घबित भरून ठेवल सांगता येत नाय “. पार्वतीचा पारा चढला. “आर अडाणचोटा मी त्यासाठी नाय आलाय तुझ्या कानावर बातमी टाकायला आलंय”. तुझी जमीन पूल बांधायला जबरदस्तीने हिसकावणारेत. माझ्या नवऱ्याला एका आमदाराशी बोलताना बघितला. काश्याला आता दरदरून घाम फुटला. काय करावं सुचेना. तो आता तूच मार्ग सांग या आशेने पार्वतीकडे पाहू लागला. पार्वती जरी शिकली नसली तरी तरी ती पुरोगामी विचारांची होती. तिला देव मान्य नव्हता. तरुणपणात मंदिर बांधण्यासाठी काही धार्मिक कंठकाणी धर्माची भीती घालून लोकांकडून पैसा वसुल केला, तेंव्हा पार्वतीने विरोध करून  मंदिराच्या बाजूला एखादं वाचनालय बांधा तरंच मंदिर उभारून देऊ. मंदिरा शेजारी वाचनालय उभं राहिलं पण त्याचा दरवाजा कधी उघडा राहिला नाही. पार्वतीची इच्छा होती, लोकांनी जाऊन पूस्तक वाचावं पण तेही झालं नाही. मग पार्वतीनेही विषय सोडून दिला. वाचनालयापेक्षा दगडाचा देव श्रेष्ठ असेल तर माणसाने दगड बनूनचं रहावं हा असं समजून ती शांत झाली. पार्वतीला काश्या आवडायचा त्यांचं प्रेम प्रकरण खूप वर्ष चाललं बापाने पार्वतीला फास लावून मरायची धमकी दिली आणि पार्वतीचं पुरोगामीत्व संपलं. बापाने एका राजकारणी माणसाशी सौदा केला होता आणि मग पार्वती एक गृहिणी झाली. काश्याने पुन्हां पार्वतीला हलवलं पार्वती या विचारातून जागी झाली. पार्वतीला एक आयडिया सुचली. पार्वती म्हणाली तुझ्या जागेत एखादी देवाची मूर्ती पुरून ठेव बाकी सगळं आपोआप होऊन जाईल. आणि दोघेही आप आपल्या रस्त्याला लागले. काशाने एक ओबढ धोबड माणसाची आकृती असणारा दगड आपल्या नदीशेजारी जमिनीत पुरून ठेवला काही दिवसांनी काश्याच्या अंगात आलं मी गाव रक्षण करायला आलोय मला काश्याच्या जमिनीत पुरून ठेवलाय मला बाहेर काढा आणि माझं मंदिर बांधा. गावाने दुसऱ्या दिवशी मूर्ती खणून काढली. काश्याला महत्व आलं. पूल बांधायला गावकऱ्यांनी विरोध केला कोपऱ्यावर मंदिर बांधलं असं खूप वर्ष झालं. पण दिवसेंदिवस नदीचा पूर वाढत गेला लोकांचे हाल होतं चालले पण पूल काही झाला नाही. शेवटी पूर्ण कथा लोकांच्या डोळ्यासमोर उभी केल्यानंतर लोकं शांत स्तब्ध उभे राहिले.

आणि लोकं काही बोलायच्या आधीच जीव सोडला. काश्याची सन्मानाने अंत्यविधी  पार पाडली. मंदिरातला देव नदीत फेकला. काही महिन्यातच पूल उभा राहिला त्या पुलाला काश्याचं नाव दिलं गेलं. पार्वतीला एक समाधान मात्र वाटलं कि लोकांनी इतकी वर्ष ज्या दगडाला पूजत होते, त्यांनी तो दगड पाण्यात फेकला. पार्वती आता हातात काठी धरून नेहमी त्या पुलावर जाऊन. वाहणाऱ्या नदीत आपल्या आठवणी कागदाच्या होडीसारख्या एक एक सोडत राहते.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

One comment

  1. सुंदर अप्रतीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *