Breaking News

राज्यसभा निवडणूक: रजनी पाटील बिनविरोध, भाजपा उमेदवाराची माघार पटोले-मंत्री थोरात यांची शिष्टाई सफल

मुंबईः प्रतिनिधी
काँग्रेस खासदार स्व. राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराबरोबरच भाजपाने आपला उमेदवार रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक रंगतदार होणार होती. मात्र काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत निवडणूक बिनविरोध करण्याबाबतचा बोलणी केली. त्यानुसार आज अखेर भाजपा उमेदवार संजय उपाध्याय हे पोट निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
दरम्यान, मागील पावसाळी अधिवेशात भाजपाच्या १२ आमदारांच्या निंलबित करण्यात आले होते. काँग्रेस नेते पटोले, मंत्री थोरात आणि फडणवीस यांच्या चर्चे दरम्यान या १२ आमदारांच्या निलंबन मागे घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानुसार या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत काँग्रेसकडून भाजपाला मदत करण्यात येणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *