Breaking News

चक्रीवादळ बाधितांना मोफत केरोसीनचे वाटप करणार अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे या भागातील वीज खंडीत झाल्याने बाधीत कुटुंबियांना केरोसीन राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्या जिल्ह्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसीन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये ३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूबांना प्रति कुटूंब मोफत केरोसीन उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका ५ लिटर केरोसीन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसीन नियतन मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बाधित कुटुंबांना प्रती शिधापत्रिका ५ लिटर केरोसीन वितरण करण्याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूबांना वाटप करावयाच्या विनाअनुदानित केरोसीनची उचल संबधित घाऊक केरोसीन परवानाधारकांमार्फत तेल कंपन्यांच्या संबंधित डेपोतून करून त्याचे वितरण बाधित कुटुंबांना प्रति कुटूंब ५ लिटर प्रमाणे करण्यात यावे. हे वितरण शक्यतो रास्तभाव दुकान/ किरकोळ केरोसीन परवानाधारकांमार्फत करण्यात यावे. मात्र विशिष्ट परिस्थितीत वेगळी कार्यपध्दती विहित करण्याची मुभा जिल्हा प्रशासनास राहिल. घाऊक केरोसीन विक्रेत्यांनी केरोसीनच्या नियमित नियतनाप्रमाणे तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये किंमतीचा भरणा करुन या केरोसीनची उचल करावी. त्यामुळे उचल व वितरणाच्या नियमित पध्दतीत कोणताही बदल राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने बाधित कुटूंबांना वितरित होणाऱ्या केरोसीनचा एक्स डेपो दरासह सर्व खर्च (घाऊक विक्रेत्याचे कमीशन, वाहतूक खर्च, लागू असेल तेथे अर्ध-घाऊक विक्रेत्यांचे कमीशन, किरकोळ विक्रेत्यांचे कमीशन इ.) सुरुवातीला संबंधित केरोसीन विक्रेत्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंब म्हणून निश्चित केलेल्या कुटूंबांनाच केरोसीनचे मोफत वितरण करण्यात यावे. अपात्र कुटूंबांना मोफत केरोसीनचे वितरण करु नये असे आदेशही त्यांनी यावेळी बजावले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *