Breaking News

शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे ५० हजार रू.ची रक्कम डिपॉझिट ठेवणार आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी... समाजातील तरुण पिढीशी - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सन्मान जगता यावे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात आयोजित खास कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्ये उपस्थित होते. यावेळी पक्षाच्यावतीने १ कोटी ८० लाख रूपयांचा निधी पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणूनही साजरा करण्यात आला.
शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार असून त्यांच्या शिक्षणाचा खर्चही या निधीतून करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी… समाजातील तरुण पिढीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवे अशी सूचना पक्षातील विद्यमान नेत्यांना त्यांनी केली.
माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही. परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात रहातो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. १९३६ साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता. सार्वजनिक जीवनात यश मिळतं. संकट येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणुस असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजानंतर शरद पवारांनी दिल्लीला दाखवून दिले स्वाभिमान काय असतो -जयंत पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र. दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे छत्रपतींनी दाखवून दिले आणि आता दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे असे गौरवोदगार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काढले.
आकाश गंगेचा तळ सापडत नाही त्याप्रमाणे पवारसाहेब यांच्या कामाचा तळ सापडत नाही. ८० व्या वर्षात नव्या पिढीला उभं करण्याचे काम फक्त पवारसाहेब करत आहेत. पवारसाहेबांनी ऐतिहासिक कर्जमाफी केली त्याची नोंद होईल. इतिहास पुरुष म्हणून आम्ही त्यांची ओळख सांगतो असेही जयंत पाटील म्हणाले.
जगाच्या पाठीवर ज्यामध्ये देशातील सामान्य लोकांच्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेबांनी केला आहे. म्हणूनच आमचं दातृत्व, मातृत्व शरद पवार साहेब आहेत असेही त्यांनी सांगितले.
शून्यातून जग कसं निर्माण करायचं ही किमया पवारसाहेब यांनी करुन दाखवले. कोणतीही परिस्थिती बदलवू शकतात हाच आदर्श आमच्यासमोर आहे. त्यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी पैसे गोळा केले. शेतकर्‍यांच्या आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला दिशा देवू शकतो असा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहेत असे उद्गार खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काढले.
या वयातही शरद पवार यांच्याकडे प्रत्येक क्षेत्रातील माहिती असते.त्यांच्याकडून आम्हाला खुप प्रेम आणि ज्ञान मिळाले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून कुणाचं नाव घेतलं जाईल ते म्हणजे शरद पवार साहेब यांचं असे विचार ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
देशातील आणि राज्यातील जी-जी क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रात पवारसाहेब यांची किमया आहे. गोरगरीबांपासून ते अमेरीकेच्या अध्यक्षांपर्यतचे मित्र पवारसाहेबांचे आहेत. असे सांगतानाच मी संपतो की काय असं वाटत असताना माझा राजकीय पुनर्जन्म शरद पवार साहेबांनी केला आहे अशी स्पष्ट कबुली आमदार छगन भुजबळ यांनी दिली.
बहुआयामी व्यक्तीमत्व शरद पवारसाहेब यांचे आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता बनवून देशात माझी ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचे काम शरद पवारसाहेबांनी केले आहे असे विचार राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देताना मांडले.
यावेळी बळीराजा कृतज्ञता कोष प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदान केला.
यावेळी पवार साहेबांचा प्रवास सांगणारी चित्रफितही दाखवण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला, शिवसेना नेते कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई उपस्थित होतेच शिवाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव पितांबर मास्टर, प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार, ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ,खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे,खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रीय प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक, आमदार दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान,आमदार राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड आदींसह पक्षाचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *