Breaking News

कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून पुढे जाऊ मात्र आरक्षणप्रश्नी भाजपा दुतोंडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

कुठल्या पध्दतीने ओबीसी आरक्षण देता येईल याबाबतीत कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करुन पुढे जाऊ. मात्र आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपाकडून नेहमीच दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान या राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला सुरुवात करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले होते आणि फेरनिर्णय घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते याची आठवणही करून देत मलिक पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका नाकारली. मात्र या राज्यात महाविकास आघाडी सरकार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ओबीसी घटकांचा इतर आरक्षणासोबत राजकीय आरक्षण राहिले पाहिजे या मताशी सहमत असल्याचे स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्टाने आयोग स्थापन करुन ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असे स्पष्ट केले आहे. शिवाय देशातील ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आलेली आहे. जर ही जनगणना झाली तर देशात, राज्यात आणि जिल्हानिहाय किती संख्या आहे याची माहिती मिळू शकते आणि पुढचा निर्णय घेता येऊ शकतो. मात्र आता सर्व कायदेशीर बाबी तपासून उचित निर्णय राज्य सरकार घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपची आरक्षणाबाबत वेगळी विचारधारा.. एक वेगळा दुतोंडी चेहरा- मलिक 

भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा असल्याची घणाघाती टीका करत मलिक म्हणाले की, जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात. मंडल आयोग आल्यानंतर भाजप त्याला विरोध करत होती ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही केली.

जी स्वप्न मोदींनी सात वर्षात दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही 

सात वर्षात महागाई कमी झाली नाही… पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत… लोकांच्या खात्यात १५ लाख आले नाहीत… दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही… जी – जी स्वप्न मोदींनी दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही अशी जोरदार टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारने सात वर्षे तर मोदींनी दोन टर्म पूर्ण केले आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे ते म्हणाले.

कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले… काही लोक बेरोजगार झाले… कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले… अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.

सात वर्षात देशात गरीब गरीबच राहिला… बेरोजगारी वाढली… महागाई जास्त झाली… लोकांच्या जीवनात कोणताच बदल भाजपच्या सात वर्षाच्या कारकिर्दीत झाला नाही ही सत्य परिस्थिती आहे असा आरोपही त्यांनी केला.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *