Breaking News

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे ” हे ” नेते प्रयत्नशील माजी आमदारांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून लॉबींग

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ महिन्याहून अधिक काळ झाला आहे. तसेच या महिन्यातच विधान परिषदेचे १२ सदस्य निवृत्त होत असून या रिक्त होणाऱ्या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल ६ जण प्रयत्न करत असून त्यातील तीन जणांसाठी दस्तुरखुद्द दोन मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रयत्न करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधान परिषदेतील १२ जागा रिक्त होणाऱ्या असल्या तरी यातील प्रत्येकी ४ जागा महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून भरल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. यापैकी राष्ट्रवादीकडून ४ जागांसाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे स्वत: प्रयत्न करत असून ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. याशिवाय बुलढाण्याचे आमदार तथा मंत्री राजेंद्र शिंगणे हे त्यांचे कट्टर समर्थक असलेले नाझिज काझी यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते मेहबूब शेख हे ही प्रयत्न करत आहेत. याशिवाय छगन भुजबळ यांच्यासोबत शिवसेना सोडलेले रविंद्र पगारे यांची विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी मंत्री स्वत: छगन भुजबळ हे प्रयत्न करत असून शरद पवार यांच्याकडे त्यांनी शब्द टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनाही विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पक्षातील तीन नेते प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही नावे अंतिम करण्यात आलेली नाहीत. मात्र त्या जागांवर आपलाच नंबर लागावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. यापैकी राजन पाटील आणि राजेंद्र पगारे यांना न्याय मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे घेणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *