Breaking News

नवाब मलिक, धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय राष्ट्रवादीकडे ? पक्षापासून दूरावलेल्या मुस्लिम आणि मागासवर्गीयांना जोडण्यासाठी प्रयत्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील राजकारणात भाजपाच्या जवळ गेलेल्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणाबरोबरच सामाजिकस्तरावरही वेगळ्या प्रयोगाची रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून प्रस्तापित ओबीसी समाजासह अल्पसंख्याक समाजाला पक्षाच्या जवळ आणण्यासाठी नवाब मलिक यांना अल्पसंख्याक मंत्री आणि धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खाते देवून या वेगळ्या प्रयोगाला सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
२०१४ आणि २०१९ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राज्यातील अल्पसंख्याक समाजाने आणि मागासवर्गीय समाजाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठ फिरविली. त्यामुळे या दोन्ही पक्षांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र राष्ट्रवादीपासून हे दोन्ही समाज दूरावणे पक्षाला परवडण्यासारखे नसल्याने प्रस्थापित नेतृत्वापेक्षा नवे नेतृत्व देणे गरजे असल्याने पहिल्यांदाच नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांच्याकडे या राजकिय खात्यांच्या मध्यमातून नवं नेतृत्व निर्मितीला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.
आजस्थितीला राष्ट्रवादीकडे मुस्लिम समाजासह इतर अल्पसंख्याक समाजाला आपलेसे वाटेल असे नेतृत्व नव्हते. मात्र ईडी प्रकरणात नवाब मलिक यांनी आखलेल्या रणनीतीचा फायदा राष्ट्रवादीला चांगलाच झाला. त्यामुळे या समाजाला पुन्हा पक्षाशी जोडण्यात चांगलाच फायदा होणार आहे. त्याचबरोबर नवाब मलिक हे मुस्लिम समुदायातील असले तरी त्यांची प्रतिमा सर्वच समाजात संयमी आणि अभ्यासू राजकारणी म्हणून आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा वापर अल्पसंख्याक समुदायाला एकत्रित करण्यासाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय राज्यात प्रस्थापित मागासवर्गीय नेत्यांमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जोगेंद्र कवाडे, माजी आमदार राजेंद्र गवई यांचे नेतृत्व जवळपास संपुष्टात आले आहे. त्यामुळे या समाजातही नव्याने आक्रमक नेतृत्व देण्यासाठी ओबीसी असलेल्या धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाचे मंत्री पद देत ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे आगामी काळात नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समुदायाबरोबर, ख्रिश्चन, जैन, बौध्द समाज अल्पसंख्याक म्हणून तर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समुदायाबरोबर मागासवर्गीय समाजातील अठरापगड जाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आल्याचे दिसल्यास नवल वाटायला नको असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *