Breaking News

स्मार्ट सिटी- क्लिन सिटीबरोबरच “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

मुंबई  : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी- क्लिन सिटी संकल्पनेबरोबर “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

हरित शहरांच्या निर्मितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी योगदान द्यावे, गृहनिर्माण सोसायट्यांची कामे करताना परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी असे सांगून ते म्हणाले की, वन हा विषय कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न अडकवता अधिकाधिक लोकांना हे काम स्वत:च्या जीवनासाठी महत्वाचे वाटले पाहिजे, हा वन सत्याग्रह आपला आणि राज्याच्या अभिमानाचा विषय वाटला पाहिजे, अशी भावना आपण निर्माण करत आहोत. म्हणूनच राज्यात महावृक्ष लागवड हा केवळ शासनाचा उपक्रम राहिला नाही, ती आता लोकचळवळ झाली आहे. पहिल्यावर्षी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८१ लाख रोपं लावून पूर्णत्वाला गेला तर दुसऱ्या वर्षीच्या ४ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची ५ कोटी ४३ लाख रोपं लावून पूर्तता झाली. लोकांनी वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा केला. या दोन्ही वर्षांच्या वृक्ष लागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.

रोपे प्रायोजित करणं,खड्डे खोदण्यासाठी मशिन्स उपलब्ध करून देणं, स्वत:च्या जाहिरातींमध्ये वनांचे, वृक्ष लागवडीचे महत्व सांगणारे संदेश देणं, टी शर्टस् देणं यासारखी अनेक काम करून बांधकाम व्यावसायिक हरित महाराष्ट्राच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. घर बनवताना घरात राहणाऱ्या लोकांसाठी झाडं लावून प्राणवायूची व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे झाडे लावण्याच्या उपक्रमात सहभागी होवून स्मार्ट बनण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बांधकाम व्यावसायिकांनी वृक्ष लागवडीसाठी गावं दत्तक घ्यावीत आणि तेथील लोकसंख्येएवढी झाडं त्या गावात लावावीत, ती जगवावीत अशी अपेक्षा केली. केंद्र शासनाने आता सीईआर अर्थात कॉर्पोरेट इन्वॉरमेंट प्लान  सादर करण्याच्या सूचना सर्व बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. त्यादृष्टीने ही बिल्डर असोसिएशनने हा विचार पुढे न्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बैठकीत महावृक्ष लागवड, हरित सेनेची नोंदणी याविषयावर सादरीकरण करण्यात आले. मुंबई आणि आसपासच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत असलेल्या वृक्ष लागवडीची माहिती यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी दिली. मुंबईतील महाविद्यालये आणि शाळांमध्ये हरित सेनेचे कॅम्प लावून विद्यार्थ्यांना हरित सेनेचे सदस्य करून घेतले जावे, अशी सूचनाही यावेळी मांडण्यात आली.

वन सचिव विकास खारगे यांनी आपल्या प्रास्ताविकात वृक्ष लागवड मोहिमेची माहिती दिली. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह बिल्डर असोसिएशनचे पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय वनाधिकारी उपस्थित होते.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *