Breaking News

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त चौबे म्हणतात, लाठीमार नाही किरकोळ झटापट

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढ एकादशी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने आज रवाना होणार होती. मात्र तत्पूर्वीच आळंदी येथे पालखी प्रस्थानाच्या आधीच वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावरून काँग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठविली. त्यावरून अखेर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या स्पष्टीकरण देत किरकोळ झटापट झाल्याचा दावा केला.

आळंदीत लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला आहे. पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत ३ वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले.

मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले होते. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी ७५ जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे.असे पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *