Breaking News

समीर वानखेडे आता दिल्ली मुख्यालयात रिपोर्ट करणार मुंबईतल्या पोस्टींगसाठी मुदतवाढीचा अर्ज केला नाही

मराठी ई-बातम्या टीम
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची मुंबईतील पोस्टींगची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपली. तसेच त्यांनी सदर पोस्टींगवरील मुदतवाढीसाठी नव्याने अर्ज केलेला नसल्याने वानखेडे यांनी दिल्लीतील डायरेक्टर ऑफ रिव्ह्युन्यु इंटेलीजन्सच्या मुख्यालयात हजर होणार असल्याची माहिती एनसीबी कार्यालयाने दिली आहे.

समीर वानखेडे आयआरएस असून त्यांचे पॅरेंट डिपार्टमेंट असलेल्या डायरेक्टर ऑफ रिव्ह्युन्यू इंटेलिजन्स अर्थात त्यांच्या मुळ विभागात रिपोर्ट करणार आहेत.

बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणात अनेक बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेते, निर्माते यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. मात्र कोर्डिलिया क्रुजवर एनसीबीने केलेल्या कारवाईत बॉलीवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यास ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे हे प्रकाशझोतात आले.
मात्र आर्यन खान या खोट्या प्रकरणात गुंतविल्याचा भंडाफोड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर यासंदर्भातील अनेक प्रकारची माहिती पुढे आली. तसेच आर्यन खान याला अटक केल्यानंतर खंडणीखोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नक्कीच काहीतरी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येवू लागला. त्यानंतर समीर वानखेडे हे धर्माने मुस्लिम असून केवळ शासकिय फायदे लाटण्यासाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविल्याचा मोठा गौप्यस्फोट मलिक यांनी केला होता. तसेच त्याविषयीची कागदपत्रे त्यांनी जाहीर केली.
त्यामुळे अखेर नवाब मलिक यांना रोखण्यासाठी वानखेडे कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली. तसेच त्यांना वानखेडे यांच्या विरोधात वक्तव्य करण्यास अटकाव करावा अशी मागणीही केली. परंतु न्यायालयाने मलिक यांच्या विरोधात तसा स्पष्ट आदेश देण्याऐवजी मलिक यांच्याकडूनच तसे हमी पत्र लिहून घेतले.
यापार्श्वभूमीवर एनसीबी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सातत्याने लक्ष लागून राहीले होते. तसेच्या त्यांच्या भूमिकेबद्दल सातत्याने उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या झोनल डायरेक्टर पदावरील मुदत संपल्यानंतरही नव्याने अर्ज केला नाही. त्यामुळे त्यांची एनसीबीतील सेवा संपुष्टात आली असून ते त्यांच्या मुळ विभागाच्या रिव्ह्युन्यु इटेलिजन्स या विभागाच्या मुख्यालयात हजर राहणार असल्याचे एनसीबीच्यावतीने सांगण्यात आले.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *