पाच महिन्याहून अधिक काळ आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदा जल्लोष करून दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्लाबोल करत आंदोलन करण्यात आले. या हल्लाबोल आंदोलनात नागपूर कनेक्शन उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी गिरगांव सत्र न्यायालयासमोर ठेवली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी आज पुन्हा सुनावली.
किल्ला कोर्टाने पहिल्यांदा अॅड.गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत आल्याने सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पवारांच्या निवासस्थानावरील हल्लाबोल आंदोलनाच्या आदल्या दिवशी सदावर्ते आणि नागपूरमधील एकाशी फोनवरून बोलणे झाल्याची माहिती पोलिसांना तपासात उघडकीस आली. सदरची माहिती आणि सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून प्रती कामगार ५४० रूपये इतके न्यायालयातील खटला चालविण्यासाठी घेतले होते. त्यातून एक कोटी ४० लाख रूपये मिळाले. हे पैसे कोणाला दिले का? याचा तपास करण्याबाबतचा मुद्दा सरकारी वकील अॅड. प्रविण घरत यांनी उपस्थित करत आणखी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.
तसेच सदावर्ते यांच्या फोन कॉलचे सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड सादर केले.
यावेळी सदावर्ते यांचे वकील वासवानी यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर केलेल्या हल्लाबोल आंदोलनात कोणतेही नुकसान झाले नसल्याचा आणि कोणालाही दुखापत झाल्याचा युक्तीवाद केला.
त्यावर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सुणावली.
यावेळी सरकारची बाजू मांडणारे वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल झालेले कलम गंभीर असून त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर सदावर्तेंनीच कामगारांना शरद पवारांच्या घराबाहेर आक्रमकपणे आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले असा आरोपही केला. तर त्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी बदलून लिहिल्याचा आरोप केला आहे, तसंच सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीसही देण्यात आली नाही, असा दावा केला.
सदावर्ते त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हते, ते मॅट कोर्टात होते, तसंच आंदोलनात घरात घुसून आंदोलन करा वगैरे कुठेही बोललो नाही, असंही वासवानी यांनी सांगितले.
