Breaking News

मुख्यमंत्री कार्यालयात आले मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, फाईल पाठवायचीय इथेच इनव्हर्ड करतात का? सोबत कार्यकर्त्यांना घेऊन टेबल टू टेबल फिरत राहिले

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतीमान सरकार-वेगवान निर्णयचा नारा देत राज्य सरकार किती गतीमान काम करत आहे, याचे दाखले प्रसिध्द करण्याचा प्रयत्न नेहमीच सरकार पातळीवरून करण्यात येत आहे. मात्र आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे दुपारी तीन च्या सुमारास अधिकाऱ्यांसोबत प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात येत टेबल टू टेबल फिरत असल्याचे पाह्यला मिळाले.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर काही मंत्री आपापल्या दालनात जाऊन कार्यालयीन कामकाज करत होते. तर काही जण लोकांना भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेण्याचे काम करत होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शासकिय बैठकांमध्ये व्यस्त होते.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात सर्वसामान्य नागरिक असो किंवा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असो त्यांना दुपारी ३ नंतर सोडण्यात येते. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री कार्यालयात येऊन त्यांच्या जवळच्या एका कार्यकर्त्याच्या कामाची फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे ही फाईल पाठवायची आहे इथेच जमा करून घेता अशी विचारणा करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला दोन वेगवेगळ्या टेबलवर सदर प्रस्तावाची फाईल इथे जमा करून घेत नाहीत असे सांगितल्यानंतर इन्हर्ड-आऊटवर्ड करण्याच्या ठिकाणी अखेर पोहोचले. तेथे गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना उद्देशून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवायच्या फाईली तुमच्याकडेच जमा करतात का अशी विचारणा केली.

मात्र तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी कोणाला काय सांगावे हेच कळेनासे झाले. मात्र अखेर एक क्लार्क दर्जाच्या व्यक्ती उठून उभा राहिला आणि त्याने सर इथेच जमा करतात असे सांगितले. त्यानंतर हीच ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवायचीय असे सांगत सोबत असलेल्या कार्यकर्त्याला ती फाईल जमा करण्यास सांगितले. त्यावर इव्हर्डचा शिक्का मारा आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या अशी सूचनाही त्या कर्मचाऱ्याला केली.

मात्र तिथेच बाजूला असलेल्या कृषी मंत्र्यांच्या पीएस कम ओएसडीने शेजारीच उभ्या असलेल्या अन्य एका अधिकाऱ्याला सर हेच ते अधिकारी आहेत असे सांगितले. त्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या अधिकाऱ्याला उद्देशून अन्य एका सोबतच्या व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश या व्यक्तीच्या मनासारखा प्रस्ताव तयार करायचा अशा सूचनाच सदर अधिकाऱ्याला दिल्या.

त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सोबत असलेला लवाजमा घेऊन मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर पडले.

दरम्यान, आपल्या अनेकविध कामासाठी जमा झालेल्या सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांकडून खाजगीत चर्चा करायला सुरुवात केली की, बघा हे यांचं गतीमान सरकार, मंत्र्यालाच माहित नाही मुख्यमंत्री कार्यालयात प्रस्तावाची फाईल कुठे द्यायची तर अन्य एका नागरिक म्हणाला की, एखादा प्रस्ताव दाखल करायला मंत्र्यालाच यावे लागते यावरून यांचे सरकार किती गतीमान हे कळले अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *