Breaking News

ईडीने जेट एअरवेजची ५३८ कोटींची मालमत्ता केली जप्त बँक फसवणूक प्रकरणी कारवाई

बँक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतर पाच जणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्या आणि लोकांच्या नावे १७ निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक कॅम्पसचा समावेश आहे.

यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी ईडीने नरेश गोयल आणि इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण कॅनरा बँकेतील ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे. या प्रकरणी ईडीने नरेश गोयल यांना १ सप्टेंबर रोजी अटक केली होती. ते सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

जेट एअरवेजला ८४८.८६ कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ५३८.६२ कोटी रुपये थकित आहेत. हे खाते २९ जुलै २०२१ रोजी फसवणूक म्हणून घोषित करण्यात आले. सीबीआयने ५ मे रोजी गोयल यांच्या मुंबईतील कार्यालयासह ७ ठिकाणांची झडती घेतली होती. नरेश गोयल, अनिता गोयल आणि जेटचे कार्यकारी गौरांग शेट्टी यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीने १९ जुलै रोजी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने गोयल आणि त्यांच्या साथीदारांच्या परिसरात छापे टाकून झडती घेतली. १ सप्टेंबर रोजी ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.

जेट एअरवेजच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये जेटने १,४१०.४१ कोटी रुपये संबंधित कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा आरोप कॅनरा बँकेने केला होता. कंपनीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. गोयल कुटुंबाचा वैयक्तिक खर्च जसे कर्मचारी पगार, फोन बिल आणि वाहन खर्च हे सर्व जेट एअरवेजने उचलले होते. गोयल यांनी १९९३ मध्ये जेट एअरवेजची स्थापना केली. २०१९ मध्ये त्यांनी एअरलाइनचे अध्यक्षपद सोडले.

जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानसेवा होती आणि दक्षिण आशियाई राष्ट्रातील सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपनीचा दर्जा होता. त्यानंतर कर्जाच्या ओझ्यामुळे १७ एप्रिल २०१९ रोजी जेट एअरवेजचे कामकाज थांबले.

जून २०२१ मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत जालान-कॅलरॉक कन्सोर्टियमने जेट एअरवेजसाठी बोली जिंकली. तेव्हापासून जेटच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापपर्यंत विमानसेवा सुरू झालेली नाही.

 

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *