Breaking News

अजित पवार यांचा फुटीर गट अचानक शरद पवार यांच्या भेटीला, आर्जव करत म्हणाला… भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संकल्पनेतून आणि शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर महाविकास आघाडीने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. त्यास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ९ आमदारांनी बंड पुकारत राज्यातील भाजपा-प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कोणती असा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने अचानक शरद पवार यांचे कार्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये जात शरद पवारांची भेट घेत त्यांचे आर्शिवाद घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, पवार साहेबांचे आर्शिवाद घेण्यासाठी आलो असून आम्ही सरकारला पाठिंबा दिला. आपणही आमच्यासोबत चला, पक्ष एकसंध राहील हे पाहा अशी भूमिका मांडल्याचे सांगितले.

तसेच पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, शरद पवार यांचे आर्शिवाद घेण्यासाठी गेलेल्या अजित पवार गटाच्या ८ मंत्री आणि प्रफुल पटेल यांनी जवळपास ३० मिनिटाहून अधिक काळ शरद पवार यांना आपली वेगळी भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया अथवा उत्तर न दिल्याने अजित पवार गटाने बैठक आवरती घेतली.

प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित ८ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दादा गटाच्या सगळ्या मंत्र्यांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सरकारला पाठिंबा दिलाय, आपणही आमच्यासोबत चला. राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहिल, हे पाहा, असं सांगून दादांच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सोमवारपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी आदल्या दिवशीच दादा गटाच्या सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे जाऊन भेट घेतली. सगळ्या मंत्र्यांनी पुन्हा शरद पवार यांना भाजपला पाठिंबा देण्याविषयी गळ घातली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ आदी नेत्यांनी पवारांचं मन वळविण्याचं प्रयत्न केला.

जवळपास चाळीस मिनिटे चाललेल्या चर्चेचा तपशील प्रफुल पटेल यांनी माध्यमांना सांगितला. ते म्हणाले, आमचं दैवत, आमचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि बाकी सगळे मंत्रिमहोदय वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता आलो होतो. पवारसाहेब एका मिटिंगच्या निमित्ताने वाय बी चव्हाण सेंटर येथे आल्याचं कळलं. मग आम्ही संधी साधून त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्याचसोबत आम्ही त्यांना विनंती केली, त्यांच्यासाठी आमच्या मनात आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहू शकतो, याचा विचार करावा, तसेच येणाऱ्या काळातील राजकारणाविषयी मार्गदर्शन करावं, त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. पण आमच्या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, असंही स्पष्ट केले.

तसेच उद्यापासून राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होतंय. अजितदादांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमहोदय त्यांचं त्यांचं काम जोमाने सुरु करील, असंही प्रफुल पटेल यांनी सांगितले.

एकंदरित शरद पवार यांनी कोणतंच उत्तर न देऊन दादा गटाचा प्रस्ताव रिजेक्ट केल्याचंच बोललं जातंय. जवळपास अर्ध्या तासांहून अधिक वेळ सुरु असलेली बैठक संपविण्याचा इशारा पवारांनी केला. दिलेल्या प्रस्तावावर पवार काहीच उत्तर देत नाहीत, हे पाहून दादा गटाच्या मंत्र्यांनीही बैठक आवरती घेतली. भाजपाबरोबर जायचं नाही, हे आधीही शरद पवार यांनी दादांच्या समर्थक आमदारांना सांगितलं होतं. आजही कोणतंच उत्तर न देऊन अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांच्या प्रस्तावच पवारांनी फेटाळून लावल्याची चर्चा सुरु आहे.

अजित पवार यांच्यासह बंडखोरी कऱणाऱ्या मंत्री यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अचानक गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांच्या बैठकीसाठी गेलेले प्रदेशाध्यभ जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड विधानभवनात आले होते. मात्र या सर्वांना शरद पवार यांनी तातडीने फोनवरून बोलावले.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *