Breaking News

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीवरील सदस्यांना कोणी ओळखता का? लिंबाळे, गवस व्यतीरिक्त एकाचीही माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नाही

मुंबई : गिरिराज सावंत-खंडूराज गायकवाड

राज्याला समतेच्या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखविणारे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीला समजावे यासाठी राज्य सरकारकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. या महापुरूषांची योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांची निवड केली जाते. परंतु नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रकाशन समितीवरील दोन-तीन नावांचा अपवाद वगळल्यास एकाही सदस्याची माहिती दस्तुरखुद्द उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नसल्याने शोधू कुठे या सदस्यांना? अशी अवस्था विभागाची झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवरील सदस्य सचिव अविनाश डोळस यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील समिती बरखास्त करत नव्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार या समितीवर डॉ.भिमराव भोसले, प्रा.रमेश पांडव, डॉ.सुनिल भंडगे, प्रा.वैजनाथ सुरनर, डॉ.शामराव अत्रे, मिलिंद कांबळे. डॉ.प्रविण रणसुरे, डॉ.ईश्वर नंदापुरे, डॉ.श्यामा घोणसे, नामदेव कांबळे, संजय साळवे, सदस्य सचिव डॉ.सुधाकर बोकेफोड यांच्यासह डॉ.शरण कुमार लिंबाळे, लेखक राजन गवस आणि मुंबई विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ.पी.जी.जोगडंद यांची नियुक्ती करण्यात आली. यापैकी दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, लेखक राजन गवस यांचा संपूर्ण राज्यात बोलबाला असून त्यांचे साहित्यही परिचित आहे. मात्र समितीवरील तीन सदस्यांशिवाय एकाची कोणतीही माहिती दलित चळवळीतील एकाही व्यक्तीला की विभागाकडे नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीवरही नव्या सदस्यांची निवड करण्यात राज्य सरकारने केली असून या समितीवर डॉ.गणेश राऊत, डॉ.सुधीर गाडे, रविंद्र गोळे, अमर हबीब, डॉ.संदेश वाघ, सीमा कांबळे, दुर्गेश सोनार, रमेश महाजन, दशरथ कुळधरण, रघुनाथ ढोक आणि सदस्य सचिव पदी डॉ.श्यामा घोणसे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु या समितीवरील एकाही व्यक्तीला फुलेवादी किंवा आंबेडकरवादी अथवा फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक म्हणून समाजात ओळखत नाहीत. तसेच त्यांचे कोणतेही लेख अथवा पुस्तक प्रकाशित झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत दलित साहित्यिक ज.वी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर नेमण्यात आलेला एकही व्यक्ती (अपवाद फक्त लिंबाळे, गवस) आंबेडकरवादी किंवा दलित चळवळीचा अभ्यासक नाही. मात्र हे सदस्य भाजपच्या विविध संघटनाशी संबधित तर काहींचा थेट भाजपशी संबध आहे. त्यामुळे या सदस्यांच्या माध्यमातून खरा आंबेडकरी अभ्यास-विचार दडपला जाण्याची भीती आहे.

यापूर्वीचे समितीचे सदस्य सचिव अविनाथ डोळस यांचे निधन ११ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. तोपर्यंत ते कार्यरत होते. तरीही या सरकारकडून ही समिती १ नोव्हेंबर २०१८ पासून स्थापन करण्यात आल्याचा अजब निर्णय जाहीर करण्यात आल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये आणि अभ्यासक कॉ.सुबोध मोरे यांच्याशीही याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, शरणकुमार लिंबाळे, राजन गवस ही दोन नावे वगळली. तर इतर सर्व नावे ही भाजपच्या सामाजिक समरसता या संघटनेशी संबधित आहेत. तसेच समितीवर नियुक्त केलेल्या सदस्यांचा आंबेडकरी आणि फुले साहित्याशी काडीचाही संबध नाही. त्यामुळे केवळ आंबेडकरी-फुले विचारात भाजपच्या समरसतेच्या विचाराचे मिश्रण करून समाजामध्ये खोटा इतिहास पसरविण्याचे सरकारचे षडयंत्र दिसत असल्याचा आरोप केला.

याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे आणि विभागाच्या सचिवांशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *