सांगलीः प्रतिनिधी
ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रिय केला त्यावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.
सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी शरद पवारच्यांवर चुकीचं विधान करणार्या चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.
विरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही पण चुकीचं बोलणार्यांचं इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे. त्यामुळे पाहिजे ते वारेमाप बोलत सुटले आहेत. पुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवालही त्यांनी केला.
मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला त्यांना बाजुला करुन प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून दुसरीकडे निवडणूक लढवावी लागली. त्या महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
भाजप सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करतेय – जयंत पाटील
सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करायचा… पाहिजे त्या स्तराला जाऊन बोलायचं यावरून भाजप कोणत्या स्तराला गेलाय हे महाराष्ट्राला त्यानिमित्ताने कळलं आहे असा टोला त्यांनी लगावला.
भाजप किती खालच्या स्तरावर गेला आहे हे त्यांच्या रोजच्या विधानाने लक्षात येते आहे. मानसिक ताण आल्यावर भाजप कोणत्या स्तराला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची विधाने आहेत. लोकं पहात असतात. लोकांना सगळ्यांची योग्यता काय असते हे माहित असतं. दुर्दैवाने इतक्या खालच्या स्तराला जाऊन देखील भाजपाला त्याबाबतीत काही वाटत नाही याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
