Breaking News

‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात

मुंबई: प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

भाजपशासीत राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार आहे. आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  हाथरस प्रकरणाची प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टामार्फत करावी. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करावे. पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला? उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली? पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या? आणि जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्वास कसा ठेवायचा? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि या प्रश्नांची उत्तरं योगी आदित्यनाथ सरकारला द्यावीच लागतील अशी मागणीही त्यांनी केली.

योगी आदित्यनाथांच्या अहंकारी व हुकुमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. काँग्रेस खा. राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व संताप व्यक्त केला. शेवटी भानावर आलेल्या युपी सरकारने राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली. पण जाताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत मस्तवाल पुरुष पोलीस अधिका-यांची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे हेच यातून दिसले. हा सत्तेचा माज असून भाजपाचा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *