Breaking News

लघुपटामध्ये झळकणार गिरीजा ओक ‘क्वॉर्टर’मध्ये दिसणार नव्या रूपात

मुंबई : प्रतिनिधी

काही अभिनेत्रींनी आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशा अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या तरी रसिकांच्या मनातील त्यांचं स्थान कधीच डळमळीत होत नाही. गिरीजा ओक ही एक अशीच अभिनेत्री आहे. गिरीजाने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत केलेली कामगिरी पाहता ती फार काळ सिनेसृष्टीपासून दूर राहू शकत नाही असंच बोललं जात होतं आणि झालंही तसंच. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच जाहिरातींच्या माध्यमातून घराघरात पोहोचत कॅमेरा आणि आपलं नातं जपण्यात यशस्वी झालेली गिरीजा आता एका लघुपटात दिसणार आहे.

एका ब्रेकनंतर पुनगरामन करताना ‘दोन स्पेशल’सारखं वेगळ्या आशयाचं नाटक आणि दैनंदिन जीवनात उपयोगी असणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींवर गिरीजाने भर दिला. आमिर खानच्या ‘तारे जमीं पर’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे थेट हिंदीतून आपली अभिनय कारकीर्द सुरू केल्यानंतर अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान निर्माण करणाऱ्या गिरीजाने ‘क्वॉर्टर’या लघुपटात अभिनय केला आहे. नेविअन्स स्टुडिओ प्रा. लि. या बँनरखाली नम्रता बांदिवडेकर यांनी ‘क्वॉर्टर’ची निर्मिती केली आहे. नवज्योत बांदिवडेकर यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कथा आणि संवादलेखन आलाप भागवत यांचं आहे. प्रथमच लघुपटात अभिनय करण्याबाबत गिरीजा म्हणाली की, कमी वेळात खूप काही सांगण्याची ताकद लघुपटांमध्ये असते, त्यामुळे लघुपट पाहायला खूप आवडतं. आपल्यालाही एखाद्या लघुपटात काम करण्याची संधी मिळावी असं कायम वाटत होतं. ‘क्वॉर्टर’द्वारे माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये वेगवेगळया धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. क्वॉर्टर मधील भूमिकाही खूप वेगळी आणि अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचंही गिरीजा म्हणाली.

गिरीजासारखी अभिनेत्री लाभणं ‘क्वॉर्टर’चं सर्वात मोठं वेगळेपण आणि यश असल्याचं मत दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी व्यक्त केलं. ‘क्वॉर्टर’मध्ये गिरीजाने साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी आम्हाला एक सशक्त अभिनेत्रीची गरज होती. कथा आणि आपल्या व्यक्तिरेखेबाबत ऐकल्यानंतर गिरीजाने लगेचच यात काम करण्यासाठी होकार दिल्याचं नवज्योत यांचं म्हणणं आहे. संदिप काळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. यश खन्ना यांनी छायांकनाचं काम पाहिलं असून संकलन आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले-सहाय यांनी केलं आहे. संगीत व्हिव्हियन रिचर्डस् यांनी दिलं असून अनमोल भावे यांनी ध्वनी आरेखन केलं आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *