Breaking News

मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांना या नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मराठी चित्रपटातील सदाबहार अभिनेते आणि चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाणारे रविंद्र महाजनी यांचे तळेगांव दाभाडेजवळ असलेल्या आंबी गावी निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी चित्रपटसृष्टीसह राजकिय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी रविंद्र महाजनी यांच्याबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला.

ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दुःख
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘रविंद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’,असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

रविंद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, रविंद्र महाजनी यांचे झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला देखणा हे विशेषण शोभून दिसायचे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.

ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रविंद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रविंद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायक :सुधीर मुनगंटीवार
‘झुंज’ या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, अशी शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
रविंद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे १९८० च्या दशकात ‘चॉकलेट हिरो’ म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.
रवींद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही मंत्री मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Check Also

अखेर विक्रम गोखले यांची रूपेरी पडदा आणि रंगमंचावरून एक्झिट

आपल्या अतुलनीय अभिनय आणि धीरगंभीर व भारदस्त आवाजाच्या जोरावर रंगमंच, दूरचित्रवाणी ते रूपेरी पडदा गाजविणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *