Breaking News

आता लग्नाची गंमत पडद्यावर पहायला मिळणार ‘मिसेस देशमुख’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

मुंबई : प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीत आज विविधांगी विषयांवर चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपत कथानकाची निवड करीत असून तितक्याच अनोख्या शैलीत सादरीकरण करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. काही चित्रपट शीर्षकांपासूनच लक्ष वेधून घेण्याचं काम करतात. त्यातीलच एक असलेला आणि नुकताच मुहूर्त झालेला ‘मिसेस देशमुख’ हा आगामी मराठी चित्रपटही याच पठडीतील आहे.

भारतीय संस्कृतीतील लग्न म्हणजे जणू एक सोहळाच असतो. वधू-वराला शोधण्यापासून त्यांची पसंती होईलपर्यंत आणि नंतर साखरपुडा, हळदी समारंभापासून थेट लग्नापर्यत या सोहळ्यात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होत असतात. याच कारणामुळे लग्न हा जरी दोन मनांच्या मिलनाचा सोहळा असला तरी त्याही पेक्षा दोन कुटुंबांना जोडणारा दुवाही असल्याचं नेहमीच म्हटलं जातं. ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटातही अशाच एका कुटुंबाची, त्यातील परस्पर भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची, वधू आणि वराची तसंच लग्नाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. देशमुख कुटुंबातील एकुलता एक चिरंजीव असलेल्या अविनाशची कथा या चित्रपटात आहे. विरोधी स्वभाव असूनही एकाच कुटुंबात नांदणाऱ्या अविनाशच्या आजोबा, वडील आणि आईचीही कथा आहे. तिघांनाही आपापल्या स्वभावाला भावणारी सून हवी असते. यात अविनाशची काय तारांबळ उडते आणि तो कोणत्या निर्णयाप्रत पोहोचतो ते म्हणजे ‘मिसेस देशमुख’ हा चित्रपट होय. हा चित्रपट वर्तमान परिस्थितीवर मिश्किलपणे भाष्य करीत तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा असल्याचं मत दिग्दर्शक राजू जाधव व्यक्त करतात. दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट जरी लग्नसंस्थेवर आधारित असला तरी आजवर कधीही समोर न आलेले लहान सहान पैलू यात अत्यंत बारकाईने, पण अतिशय ठळकपणे मांडण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेतील विविध पदर, तसंच कथानकातील प्रसंग प्रत्येकाला आपल्याच आयुष्यातील असल्यासारखे वाटतील आणि त्यामुळेच प्रत्येक प्रेक्षक या चित्रपटाशी स्वत:ला रिलेट करेल. एका अनोख्या कथानकाला अभिनय, संगीत आणि उत्तम सादरीकरणाची जोड देत लक्षवेधी तसंच मनाला भिडणारी कलाकृती बनवण्याचा आपला मानस असल्याचंही दिग्दर्शक राजू जाधव म्हणाले.

आराधना फिल्म्स क्रिएशन्सची निर्मिती असलेला ‘मिसेस देशमुख’ हा चित्रपटही लग्न आणि त्याच्याशी संबंधित घटनांशी निगडीत आहे. रागिणी कडणे आणि वैशाली जाधव या चित्रपटाचे निर्माते असून, राजू जाधव यांनी दिग्दर्शन केलं आहे. राजू जाधव, राजेन्द्र कुबल आणि सादिक खान सह निर्मात्याच्या भूमिकेत ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत मोलाचं सहकार्य करीत आहेत, तर अरविंद चांडक, राहुल बूब आणि विकास मुंदडा या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते आहेत. राजन अग्रवाल यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. तर यतीन कार्येकर, विजय पाटकर, कमलेश सावंत, नयना आपटे, माधव अभ्यंकर, मिलिंद दास्ताने, दिपाली साठे आदि कलाकारांनी या चित्रपटात नानारंगी व्यक्तिरेखा चितारल्या आहेत. सादिक खान यांनी या चित्रपटाचे छायांलेखक आहेत. प्रकाश कदम यांनी या चित्रपटसाठी प्रसांगानुरूप संवादलेखन केलं आहे. अश्विन भंडारे यांनी गीतलेखन केलं असून, अमेया नरे आणि साजन पटेल यांचं संगीत व पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभणार आहे. मनिष चौधरी या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ होणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *