Breaking News

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार बशीर मोमीन (कवठेकर) यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप रु.५ लाख, मानपत्र व  सन्मानचिन्ह असे आहे.

लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन ( कवठेकर ) यांचा जन्म मु. कवठे (येमाई) तालुका शिरुर जि. पुणे येथे १ मार्च १९४७ रोजीचा आहे. त्यांचे नववी पर्यंतचे शिक्षण झालेले आहे.त्यांना शालेय जीवनातच शाहिरी आणि काव्य लेखनाचा छंद असल्याने पुढे त्यांनी लावण्या, कलगीतुरा, वगनाट्य, पोवाडे, नाट्य छटा व इतर विषयावरही लेखन केले आहे. तसेच त्यांनी बाईने दावला इंगा, इस्कान घेतला बळी, तांबड फुटल रक्ताच, भंगले स्वप्न माझे, भक्त कबीर व सुशीला मला क्षमा कर अशी ६ वगनाट्य लिहिली आहेत. वेडात मराठे दौडले सात, लंका कुणी जाळली या ऐतिहासिक नाटकांचे त्यांनी लेखन केले. त्यांना साहित्य लेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गीत लेखन केले आहे. त्यांची सोयऱ्याला धडा शिकवा, दारू सुटली चालना भेटली, मनाला आळा एडस टाळा,दारूचा झटका संसाराला फटका, हुंड्यापाई घटल सार, बुवाबाजी ऐका माजी ही   लोकनाट्य आकाशवाणी वर प्रसारित झाली  आहेत. दारूबंदी,गुटखा, हुंडाबंदी इत्यादी शासनाच्या योजनांच्या प्रचारात काम केले असल्यामुळे त्यांना व्यसनमुकती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

नेताजी पालकर, भ्रमाचा भोपळा व भंगले स्वप्न माझे या वगनाट्यात त्यांनी भूमिका केल्या आहेत. मोमीन कवठेकर यांनी दत्ता महाडिक पुणेकर, काळू-बाळू लोकनाट्य, रघुवीर खेडकर लोकनाट्य मंडळ, गंगाराम बुवा कवठेकर अशा नामांकित लोकनाट्य मंडळात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. तमाशा क्षेत्रातील कलावंतामध्ये त्यांची साहित्यिक अशी ओळख आहे. मोमीन कवठेकर यांच्या साहित्यावर पुणे विद्यापीठात पीएच.डी. करण्यात आली असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून त्यांना गौरविण्यात आले आहे.

नवसाची यमाई भाग १, नवसाची यमाई भाग २, कलगी तुरा, अष्टविनायक गीते, सत्वाची अंबाबाई, वांग्यात गेली गुरं,रामायण कथा, कऱ्हा नदीच्या तीरावर, येमाईचा दरबार हे त्यांचे भक्ती गीत व लोक गीतांचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. देशभक्त बाबू गेनू, कृतघ्न या आगामी चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन केले आहे. असा त्यांचा आज पर्यंत ४ हजार हून अधिक गीतांचा लेखन प्रपंच आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील दत्तोबा फुलसुंदर, लता पुणेकर, जयमाला इनामदार,प्रकाश खांडगे, विद्याधर जिंतीकर व श्यामल गरुड यांनी सन २०१८ या वर्षीच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड एकमताने केली आहे.

या पूर्वी हा पुरस्कार कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, मंगला बनसोडे,साधू रामा पाटसुते, अंकुश खाडे उर्फ बाळू, प्रभा शिवणेकर, भीमाभाऊ सांगवीकर, गंगारामबुवा कवठेकर, राधाबाई खोडे नाशिककर व मधुकर नेराळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *