Breaking News

आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल गजेंद्र-शशांकचे अजब नाटक

मुंबई : प्रतिनिधी

सिनेमांसाठी कायम नवनवीन विषयांच्या शोधात असणाऱ्या काही मोजक्या दिग्दर्शकांच्या यादीत गजेंद्र अहिरे हे नाव कायम आघाडीवर असतं. गजेंद्र अहिरे यांनी नेहमीच विविधांगी विषयावर तसंच कधीही न हाताळलेल्या मुद्द्यांवर सिनेमे बनवले आहेत. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून काहीसे गप्प बसलेले अहिरे सध्या नेमकं काय करताहेत याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अहिरे लवकरच ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ असं काहीसं अजब शीर्षक असलेल नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नाटकात त्यांच्या जोडीला आहे शशांक केतकर.
‘नॅाट ओन्ली मिसेस राऊत’पासून अहिरेंच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्यांनी कायम नावीन्याचा शोध घेणारे सिनेमे बनवल्याचं लक्षात येईल. ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ या शीर्षकावरून हे नाटकही त्याच वाटेने जाणार असल्याचं जाणवतं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने शशांकने प्रथमच अहिरेंसोबत काम केलं आहे. शीर्षकावरून कथानकाचा जराही थांगपत्ता लागत नाही, पण काहीतरी नक्कीच गंमतशीर आणि मार्मिक असणार याची चाहूल लागते. एकदंत क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाची निर्मिती चंद्रकांत लोहोकारे आणि हर्षल बांदिवडेकर यांनी केली आहे.
‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ या नाटकाच्या दिग्दर्शनासोबतच लेखनही गजेंद्र अहिरे यांनीच केलं आहे. शशांकसोबत यात नेहा जोशी, नम्रता संभेराव, प्रणव जोशी, किरण राजपूत, श्रद्धा मोहिते आदि कलाकारांचा समावेष आहे. गोट्या सावंत याचे सूत्रधार असून संगीत शैलेंद्र बर्वे यांचं आहे. गजेंद्र अहिरेंसारख्या मातब्बर दिग्दर्शकासोबत काम करणं म्हणजे एका चालत्या बोलत्या सिनेनिर्मिती संस्थेत काम करण्याच्या अनुभवाप्रमाणे असल्याचं शशांक मानतो. तर शशांक एक हुषार अभिनेता असून ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ मधील व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारण्यासाठी सक्षम असल्यानेच त्याची निवड केल्याचं अहिरे मानतात. थोडक्यात काय तर या नाटकाच्या निमित्ताने गजेंद्र आणि शशांक यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *