Breaking News

लवकरच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलिस उपनिरिक्षकांपर्यंतच्या बदल्या होणार

निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघा महिना शिल्लक राहीलेला असतानाच राज्याच्या विविध भागात नियुक्तीवर असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पासून नायब तहसीलदार आणि पोलिस दलातील आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते पोलिस उपनिरिक्षक पदावरील सर्वांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत राज्याची प्रशासकिय व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करायची आणि कोणाची नाही याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्वानुसार एखाद्या अधिकाऱ्यास निवडणूकीच्या कामाची जबाबदारी सोपवायची असल्यास त्या व्यक्तीने त्या त्या जिल्ह्यात मागील तीन वर्षापूर्वीपासून सेवा बजावलेली नसावी, तसेच तीन वर्षापूर्वी कोणत्याही पोटनिवडणूक, निवडणूकीचे काम केलेले नसावे अर्थात २०१४ साली झालेल्या निवडणूकीसाठीही सदर अधिकाऱ्याने काम केलेले नसावे, याशिवाय एखाद्या महसूली विभागात तीन वर्षाहून अधिक काळ काम केलेले नसावे, तसेच त्या अधिकाऱ्याचे मुळ रहिवासी ठिकाण असलेल्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येवू नये आणि एखाद्या अधिकाऱ्याची त्याच महसूली विभागात आहे त्याच ठिकाणी पदोन्नती देण्यात आली असेल तर त्या अधिकाऱ्यास त्या विभागात आणि जिल्ह्यातील निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात येवू नये असे स्पष्ट मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आले आहे (सदर मार्गदर्शक तत्वाची कागदपत्रे मराठी e-बातम्या.काँमकडे आहेत).

त्याचबरोबर याच तत्वानुसार पोलिस खात्यातील आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते पोलिस उपनिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहे. याशिवाय ग्रामविकास विभागातील बीडीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिल्याची माहिती महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारच्या नागरी सेवा कायद्यात केवळ निवडणूकीच्या कामाकरीता कोणत्याही अधिकाऱ्याला प्रतिनियुक्ती देण्याची तरतूद नाही. तसेच निवडणूकीची आचारसंहिता एकदा लागू झाली कि किमान तीन ते चार महिने तो अधिकारी निवडणूकीच्या कामात गुंतला जातो. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने नियमित बदल्या करण्याचा विचार महसूल आणि गृह विभागाकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व अधिकाऱ्यांची माहिती जमा करून निवडणूक आयोगाला सादर करावयाची आहे. राज्यातील निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबईच्या दौऱ्यावर ३० जानेवारी रोजी येत आहेत. त्यावेळी या सर्व अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची माहिती त्यांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *