Breaking News

वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी

वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणाऱ्या निर्माणाधीन पुलाचा गर्डर अचानक कलंडल्याने १४ कामगार जखमी झाले.  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

ही दुर्घटना दुर्दैवी असून दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.

जखमी कामगाराची रुग्णालयात जाऊन घेतली भेट

या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या १३ कामगारांना उपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर केवळ एक कामगार डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहे. मंत्री शिंदे यांनी व्ही.एन देसाई रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस केली. तसेच त्याच्यावर नीट उपचार करण्याच्या सूचना डॉक्टराना दिल्या.

यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही. श्रीनिवास राव, स्थानिक पोलीस अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून करणार पूल दुर्घटनेची चौकशी.

जखमी कामगाराची मंत्री शिंदे यांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात जाऊन घेतली भेट.

Check Also

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे कल्पिता पिंपळे यांनी केली ही मागणी चिंता करू नका लवकर बरे व्हा हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ठाणे : प्रतिनिधी अनधिकृत फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *