Breaking News

अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मुंबईबाहेर जावून घेतली कोरोनाची आढावा बैठक लोकप्रतिनिधींनी शासन-नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी

पुणे : प्रतिनिधी

मागील काही काळापासून राजकिय विरोधकांकडून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घरात बसून कोरोना महामारीचा आढावा घेत असल्याची टीका सातत्याने करण्यात येत होती. तसेच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार हे राज्यातील चार जिल्ह्यांचा दौरा करतानाही त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारले गेले. त्यावेळी कप्तान मुंबईत बसून कंट्रोल ठेवत असल्याची सारवासारव त्यांनी केली. त्यानंतर दोन दिवसात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईबाहेर पुणे येथे जावून पहिल्यांदाच यासंदर्भात आढावा बैठक घेत त्याविषयी चर्चा करून सूचना केल्या.

यावेळी झालेल्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले.  कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या, जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच कोरोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब आहे, अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी हे प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून मुख्यमंत्री  म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे तसेच प्रत्येक प्रभाग अधिका-याने आपल्या प्रभागात कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करा, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला कोरोनामुक्त करूया, असा आशावाद व्यक्त करतानाच येत्या काही  दिवसात आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितपणे मात करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे तसेच पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन-नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी

पुण्यातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत याप्रश्नी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी.

पुण्यातील विधान भवन सभागृहात बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविड – 19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन केले.

Check Also

पीओपीच्या मुर्त्या तयार करण्यास अखेर परवानगी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना केलेली विनंती मान्य

मुंबई : प्रतिनिधी पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *