Breaking News

शिवस्मारक उभारता न आल्याचे विरोधकांना शल्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, यापलिकडे कोणताही धंदा सचिन सावंत यांनी केला नाही आणि नवाब मलिक यांना तर शिवस्मारकाचे कधीच अप्रुप नव्हते, त्यामुळेच पोकळ आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मार्च २०१८ मध्ये या विषयावर सविस्तर निवेदन राज्याच्या विधानसभेत केले होते. प्रत्यक्ष पुतळा आणि चौथरा याचे गुणोत्तर ६०ः४० असे असते. त्यानुसार, २१० मीटर उंचीच्या पुतळ्यामध्ये १२१.२ मीटर व ८८.८ मीटर असे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी सर्व तांत्रिक बाजू तपासून प्रस्तावित केली. प्रारंभी निविदा प्रक्रिया जरी २१० मीटरच्या हिशेबाने पूर्ण करण्यात आली तरी त्यानंतर उंची २१२ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात चबुतर्‍याची उंची कायम ठेऊन पुतळ्याची उंची वाढविण्यात आली. केंद्राकडून सर्व परवानग्या आणण्यापासून ते प्रत्यक्ष काम सुरू करण्यापर्यंत सर्व कामे ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात झाली आणि आपण ती करू शकलो नाही, याचेच शल्य विरोधकांच्या मनात आज अधिक असल्याची टीका त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली.
एकही वीट न रचता पैसे दिल्या गेल्याचाही आरोप धादांत खोटा आहे. मुळात २ ते ३ महिने शिवस्मारकाचे प्राथमिक काम झाले आहे आणि एकही रूपया अजून कंत्राटदाराला देण्यात आलेला नाही. कंत्राट अंतिम करताना मुख्य सचिवांची समिती असते. तर सर्व निर्णय हे सुकाणू समितीत सर्व संमतीने होत असतात. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांचा सुद्धा समावेश असतो. मुळात शिवाजी महाराजांचा सन्मानच आघाडी सरकारला करता आला नाही आणि आता काम होताना दिसते आहे, तर त्यांना पोटशूळ उठला असल्याची टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *