Breaking News

अखेर भातखळकर यांना सभागृहाची समज विरोधक आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकारची माघार

नागपूर : प्रतिनिधी

विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या मुद्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज २० मिनिटासाठी तहकूब करत सर्वपक्षिय नेत्यांच्या उपस्थितीत अतुल भातखळकर यांना समज देत याविषयावर पडदा टाकला.

विरोधकांबरोबर शिवसेनेच्या सदस्यांनी भातखळकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांनी सभागृहाबरोबर राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली. त्यानुसार भातखळकर यांनी सदर वक्तव्यावरून सभागृहाची माफी मागितली. मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भातखळकर यांना निलंबित केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचे जाहीर केले.

त्यातच सर्व विरोधी पक्षीय आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु केले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली.

त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना कामकाज चालविणे अशक्य झाले. अखेर अध्यक्ष बागडे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सभागृहातच विनंती करत बाबा तुम्ही तरी समजून घ्या, सभागृहाचे कामकाज चालू द्या अशी विनंती केली. मात्र विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहीले.  पुन्हा काही कालावधीनंतर अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना याबाबत विचारणा केली. त्यावर विखे-पाटील यांनी यासंदर्भात अध्यक्षांनी त्यांच्या दालनात एक बैठक बोलवावी आणि त्यांना किमान एका दिवसासाठी तरी निलंबित करावे अशी मागणी केली.

त्यावर अध्यक्ष बागडे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी सभागृहाचे कामकाज २० मिनिटासाठी तहकूब केले. पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर अतुल भातखळकरांना समज देण्यात आली असून भविष्यकाळात त्यांनी याप्रकारची वक्तव्ये करू नयेत अशी ताकिद दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *