Breaking News

सत्ताधारी भाजप आणि शिवसेना समोरासमोर काँग्रेसबरोबर शिवसेनेच्या विरोधामुळे सत्ताधारी भाजप गारठली

नागपूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उंचीवरून सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने सभागृह तहकुबीनंतर पुन्हा सुरु झाल्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे अतुल भातखळकर यांनी महाराजाबद्दल अपशब्द वापरल्याचा मुद्दा उपस्थित करत याप्रश्नी त्यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी भातखळकर यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. त्यानुसार भलता हा शब्द हा आपण महाराजांबद्दल नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल वापरल्याचे सांगत सदर शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. परंतु सुरुवातीला मवाळ भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने सदर वक्तव्यावरून पुन्हा यु टर्न घेत भातखळकरांनी माफी मागण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सभागृहात पहिल्यांदाच भाजप, शिवसेना समोरासमोर आल्याचे चित्र दिसले.

मात्र विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी भातखळकर यांचे वक्तव्य हे महाराजांना उद्देशूनच होते. त्यामुळे त्यांनी सभागृहाची माफी मागावी आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली.

त्यानंतर विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीही विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करत भातखळकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला. त्यावर विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी भातखळकर यांना निलंबित केल्याशिवाय आणि त्यांनी माफी मागितल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यास सुरुवात केली.

त्यातच शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी याप्रश्नी भूमिका मांडत सुरुवातीला भातखळकर यांनी तसा शब्द वापरला नसल्याचे सांगत त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र कालांतराने शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी महाराज हे महाराष्ट्राबरोबर देशाचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांचा सर्वात मोठा पुतळा उभारलाच पाहिजे. तसेच महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भातखळकर यांनी सभागृहाची आणि राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर पुन्हा भातखळकर यांनी वक्तव्य मागे घेत असल्याचे पुन्हा सांगितले. मात्र शिवसेनेचे सदस्य आक्रमक होत याप्रश्नी त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी भूमिका घेतली.

त्यातच काँग्रेसच्या सदस्यांबरोबर शिवसेनेचे सदस्यही अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेकडे जात असताना त्यांना रोखण्यासाठी भाजपचे सदस्य योगेश सागर हे त्यांच्या जागेवरून आले. त्यामुळे सभागृहात पहिल्यांदाच भाजपच्या सदस्याच्या विरोधात शिवसेना सदस्य उभारल्याचे चित्र दिसले. मात्र प्रसंगावधान साधत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, महादेव जानकर, सुनिल प्रभू यांनी शिवसेनेच्या सदस्यांना रोखले. या गदारोळातच सभागृहाचे कामकाज पुन्हा १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

दऱम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावरही सरकारच्या या धोरणाविरोधात आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *