Breaking News

सरकार रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का ? विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी

शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला आज केला.

राज्यात सुरू असलेल्या दुधाच्या आंदोलनाच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये उपस्थित अल्पकालीन चर्चेत  धनंजय मुंडे बोलत होते.

देशातील पहिला शेतकरी संप राज्यात झाला. मार्च महिन्यात मुंबईच्या विधानभवनावर शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आला आणि आता शेतकऱ्यांना रस्त्यावर दुध ओतावे लागत आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच नाही असे सरकारने धोरण ठरवले आहे काय? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.

सरकारने २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला २७ रूपये आणि म्हशीच्या दुधाला ३६ रूपये भाव जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांना केवळ १७ रूपये भाव मिळत आहे. आंदोलन केल्यानंतरही सरकार केवळ मलमपट्टी करण्याचे धोरण अवलंबित आहे. केवळ घोषणांमुळे दुध उत्पादकांचे पोट भरणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे तो रस्त्यावर उतरला आहे.

दुग्धविकास राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कालच्या शेतकरी दुधात पाणी टाकतात या वक्तव्याचा समाचार घेताना नागपुरच्या सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना समजत नाहीत. दुधातले पाणी कसे दिसते ? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला.

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना एका दुध उत्पादक शेतकऱ्याने फोन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या ५५ वर्षाच्या वडिलांना जेलमध्ये टाकण्याचा, चौकशी करण्याच्या कृतीचाही त्यांनी समाचार घेताना शेतकऱ्यांनी तुम्हाला जाबही विचारायचा नाही का, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी केला.

दुधाला प्रतिलिटर ५ रूपये थेट अनुदान द्या, दुध भुकटी निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढ करा, हे अनुदान दोन महिन्यांसाठी नव्हे तर सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *